नवी मुंबई : नवी मुंबईत एकाच दिवशी दोन सोनसाखळी जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटना रात्री घडल्या असून गुन्हे पद्धतीत साम्य आहे. एका घटनेत रिक्षा चालकाला पैसे देत असताना गळ्यातील सोनसाखळी हिसाकावण्यात आली आहे तर दुसऱ्या घटनेत महिला रिक्षात बसत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने सोनसाखळी हिसकावून पोबारा केला आहे. दोन्ही घटनेत मिळून १० लाखांच्या पेक्षा अधिक किमतीच्या तीन सोनसाखळ्या चोरी करण्यात आल्या आहेत.

वाशी सेक्टर १२ येथे शगुन सोसायटीत राहणाऱ्या पद्मा येचुरी या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. आपले काम संपवून त्या घरी रिक्षाने परंतल्या. राहत्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर रिक्षा थांबवून त्या रिक्षातून उतरून रिक्षा चालकाला पैसे देत होत्या. तेवढ्यात दुचाकीवरून दोन व्यक्तीं आल्या. त्यांच्याजवळ येताना ते सावकाश गाडी चालवत होते. जवळ येतच दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने पद्मा यांच्या गळ्यातील पाच लाख रुपये किमतीचे ५५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. फिर्यादी यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार दुचाकी चालवणाऱ्याने हिरवा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती तर मंगळसूत्र हिसकावणारा मागे बसलेल्या व्यक्तीने पिवळा टी शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती.

ही घटना बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली तर या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात रात्री साडे अकरा वाजता दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत उषा चौगुले यांच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या याच पद्धतीने चोरी झाल्या. उषा या डोंबिवली येथे राहणाऱ्या असून कामानिमित्त नवी मुंबईतील महापे येथे आल्या होत्या. आपले काम आटोपून त्या अन्य ठिकाणी जाण्यास रिक्षात बसत होत्या. तेवढ्यात त्यांच्या समोर एक दुचाकी अचानक येऊन थांबली. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या जबरदस्तीने हिसाकावून पोबारा केला. यात एक सोनसाखळी चार तोळे वजनाची ३ लाख ८० हजार रुपयांची तर दुसरी सोनसाखळी मंगळसूत्र असून ते दीड तोळे वजनाचे १ लाख ४ हजार ५०० रुपयांचे होते. . चोरट्यानीं एकूण ५ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरी केला.

फिर्यादी यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार काळ्या दुचाकी वर दोघे आले. त्यातील गाडी चालवणाऱ्यारा तिशीचा होता तर सोनसाखळ्या हिसकावणाऱ्यानें काळा टी शर्ट घातला होता.ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली तर या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुरुवारी अपरात्री दीड वाजता तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.