नवी मुंबई : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवारी नवी मुंबई पोलिसांना लक्ष्य केले. नवी मुंबई पोलीस दलातील उच्च अधिकाऱ्यांनी गेली दोन वर्षे धुमाकूळ घातला असून सर्वसामान्यांना पोलीस ठाण्यात न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. केवळ आर्थिक फायदा असणाऱ्या प्रकरणात लक्ष घातले जात असल्याचा आरोप करीत उच्च अधिकाऱ्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशीची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई पोलीस दलात मुंबई पोलिसांप्रमाणे अवैध धंद्यातून वसुली करणारे अनेक सचिन वाझे आहेत.  जेएनपीटी बंदरातील रक्तचंदन तस्करी, डिझेल चोरी, बंदी असलेली गुटखा, गोमांस विक्री, उलवा नोडमध्ये मद्य विक्रीला परवानगी नसताना होणारी मद्यविक्री, बेकायेदशीर मसाज पार्लर, त्यामधून होणारी देहविक्री, रात्री उशिरा चालणारे पब, लेडीज बार हे सर्व प्रकार उच्च अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

नवी मुंबईतील काही उच्च पदांवर येणारे अधिकारी हे गेली दहा वर्षे ठाण मांडून असून याच ठिकाणी ते सहाय्यक पोलीस ते उपायुक्त पदापर्यत पोहचले आहेत. काही अधिकाऱ्यांनी तर वजन आणि लक्ष्मी दर्शन घडवून या ठिकाणी पुन्हा वर्णी लावून घेतली आहे. जेएनपीटी बंदरात माल खाली करण्यासाठी हजारो ट्रक एका रांगेत अनेक दिवस उभे असतात. त्यांच्याकडून वाहतूक पोलीस दरदिवशी दोनशे ते चारशे रुपये बेकायदेशीर पार्किंग चार्ज घेत असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला. पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेलेल्या नागरिकाची जास्त उलटतपासणी केली जात असून दलालांना सन्मान दिला जात असल्याचा आरोपही केला आहे.  सर्वसामान्यांना घर देतो सांगून फसवणाऱ्या शेकडो विकासकांच्या तक्रारी पोलिसांत दाबल्या गेलेल्या आहेत. या सर्वाची तडजोड ही नवी मुंबई स्पोर्टस क्लब या संकुलाच्या खोल्यांमध्ये होत असून तेथील सीसी टीव्ही चित्रण तपासण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. या सर्व आरोपांची तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विरोधी पक्षनेते यांच्याकडे करण्यात आली असून पोलीस आयुक्त बिपीन सिंह व वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

आमदार म्हात्रे यांनी एका कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती. ती नाकारण्यात आलेली नाही. त्यासाठी वेगळी जागा सुचविण्यात आली होती. त्यांचा याबद्दल गैरसमज झाला आहे. इतर आरोपाबाबत आपण काहीही बोलू शकत नाही.

-पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, नवी मुंबई पोलीस

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serious allegations navi mumbai police demand inquiry directorate enforcement high officials ysh
First published on: 20-05-2022 at 00:02 IST