नवी मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचा मुलगा विनीत चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ज्या लोकांसाठी काम करतो त्या नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि माथाडींच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. परंतू, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि माथाडी युनीयनमध्ये चंद्रकांत पाटील हे पूर्वीपासून सक्रीय आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षासाठी धोक्याचे मानले जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मुलासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबईतील स्थानिक राजकारणात नवीन समीकरण घडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करत असताना असे जाणवले की ते लोकासांठी धावून जातात, पक्षपात न करता जनतेची कामे करतात. प्रकल्पग्रस्तांचे, अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे यांची नक्कीच मदत होईल. ज्या ठिकाणी मदत होते त्यांच्यासोबत काम केल्यास सोईस्कर होईल म्हणुन त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला, असे चंद्रकांत पाटील यांनी पक्ष प्रवेशावेळी सांगितले.

राष्ट्रवादी विषयी किंवा कोणाविषयी कोणतीच नाराजी नसून केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी हा प्रक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. पक्षप्रवेशावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, उपजिल्हाप्रमुख सुरेश कुककर्णी, उपजिल्हाप्रमुख विलास भोईर उपस्थित होते.