|| जगदीश तांडेल

दहा वर्षांपूर्वी झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत उरण, पनवेल व खालापूर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद गटांचा मिळून उरण हा मतदारसंघ तयार झाला आहे. दोन सत्रात या मतदारसंघाने दोन नवीन आमदारांना संधी दिलेली आहे. या मतदारसंघावर पहिला विजय हा शेकापने संपादित केला. मात्र २०१४च्या दुसऱ्या निवडणुकीत शेकापचा शिवसेनेने पराभव केला. या निवडणुकीत शिवसेना व भाजप दोन्ही पक्षांनी आपला दावा केला होता. मात्र युतीचं ठरले असून विद्यमान आमदार मनोहर भोईर यांना शिवसेनेने ए.बी.फार्म दिला आहे. त्यामुळे ही जागा शिवेनेलाच मिळाल्याचे स्पष्ट झाले असून भाजपाचे इच्छूक उमेदवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. त्यांनी मी निवडणूक लढणारच असे यापूर्वी जाहिर केले होते. त्यानुसार त्यांनी अपक्ष  म्हणून अर्ज भरला असून ते रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तरंगी लढतीची शक्यता आहे.

हा मतदारसंघ औद्योगिक विभागाप्रमाणेच, ग्रामीण भाग असा आहे. हा मतदारसंघ रायगड जिल्ह्य़ात असला तरी लोकसभेसाठी पुण्यातील मावळ मतदारसंघात आहे, तर दुसरीकडे विकासासाठी नवी मुंबईशी त्याची नाळ जुळलेली आहे.

मतदारसंघात एक लाख ४७ हजार २९८ पुरुष तर एक लाख ४५ हजार ६५० असे एकूण दोन लाख ९२ हजार ९५१ मतदार आहेत. मात्र, उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात भाजपचे जिल्हा चिटणीस महेश बालदी यांनी पाच वर्षांपासूनच निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा भाजपच्या नेत्यांच्याच उपस्थितीत केली होती. त्यामुळे उरण मतदारसंघात युतीत बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत शेकाप असून शेकापने आपले उमेदवार म्हणून माजी आमदार विवेक पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

विद्यमान आमदार म्हणून शिवसेनेलाच ही जागा मिळाली आहे. मागील पाच वर्षांत शेकाप तसेच काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायती भाजप तसेच शिवसेनेने जिंकल्या आहेत. तर अनेक कार्यकर्तेही या दोन्ही पक्षात डेरेदाखल झाले आहेत.

मतदारसंघातील प्रमुख समस्या

मागील दहा वर्षांपासून उरणमधील प्रस्तावित १०० खाटांचे रुग्णालय, उरणच्या जनतेला सध्या जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी व त्यामुळेच होत असलेले अपघात, या अपघातात नाहक जाणारे जीव, औद्योगिक विभाग असूनही रोजगार मिळत नाहीत. तर दुसरीकडे गोदामे बंद पडत असल्याने असलेले रोजगारही गमवावे लागले आहेत. पिण्याच्या पाण्याची कमतरता, घटती शेती, होतकरू खेळाडूंसाठी मैदानांची कमतरता आहे.

झालेली विकासकामे

चौथ्या सिंगापूर बंदराची उभारणी

करंजा येथील मासेमारी बंदराच्या कामाची सुरुवात

नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण

घारापुरी बेटावर विजेची व्यवस्था

मतदारसंघात एकूण १३० कोटींची कामे केलेली आहेत. यामध्ये नागरिकांच्या रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी, समाज मंदिर या सोयी करण्यासाठी निधीचा वापर केला आहे. उरणमधील हजारो घरांना अनधिकृत ठरविणाऱ्या नौदलाच्या सुरक्षा पट्टय़ातून नागरिकांची सुटका करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न तसेच समुद्राच्या पाण्यामुळे नापिकी होणाऱ्या हजारो एकर शेत जमिनी वाचविण्यासाठी निधी आणला. त्याचप्रमाणे ससून डॉकच्या धर्तीवरील करंजातील मच्छीमार बंदरासाठीही प्रयत्न केला आहे. –आमदार मनोहर भोईर, उरण

मतदार म्हणतात

या निवडणुकीत आमच्यानागरी सुविधा सोडविण्यासाठी जो पक्ष प्रयत्न करीलत्याचाच विचार आम्ही करणार आहोत. मतदारसंघातअनेक समस्या असून त्या सोडविण्याचे कोणत्याही पक्षाने प्रयत्न केलेले नाहीत. केवळ आश्वासनांवरच बोळवण केली आहे. त्यामुळे यावेळी मतदार म्हणून त्याचा विचार करावा लागेल.- पद्माकर पाटील, मतदार

प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी रस्त्यावर यावे लागत आहे. या संदर्भात कोणत्याही पक्षाने निश्चित भूमिका घेतलेली नाही. भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याऐवजी कंत्राटे घेण्यात राजकीय नेते मश्गूल आहेत. त्यामुळे आमचे प्रश्न प्रलंबित असून सिडको, जेएनपीटी तसेच इतर प्रकल्पग्रस्तांचीही हीच स्थिती आहे.-विवेक केणी, मतदार