नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुईनगर येथील सेक्टर २३ मधील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर चक्क एका व्यक्तीची मतदार म्हणून नोंदणी झाल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर गेल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरू झाली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी प्रक्रियाला सर्वात करण्यात आली आहे. अशातच नवी मुंबईत निवडणूक यादीत घोळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनीच जारी केलेली बेलापूर विधानसभा (क्रमांक १५१) मधील अधिकृत मतदार यादी सादर केली. त्या यादीतील १४८ क्रमांकाच्या मतदार यादीत अनुक्रमांक ५१ वर एका मतदाराचे नाव असून, त्याचा पत्त्यासमोर “सुलभ शौचालय” असा उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच काळे यांनी सांगितले, “या शौचालयामध्ये कोणीही वास्तव्यास नाही. तरीही त्या पत्त्यावर मतदार नोंदणी झाली आहे. हे अत्यंत गंभीर असून निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.”त्यांनी काळे यांच्या सांगण्यानुसार, “या प्रकरणाची माहिती त्यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.” या प्रकारामुळे मतदार नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत शंका निर्माण झाली असून, या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.