पहिली मात्रा देण्यासाठी फक्त तीन हजार कुप्या शिल्लक
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडे लस कुप्यांचा तुटवडा भासू नये यासाठी पालिकेने शासनाकडे मागणी केली आहे. मात्र पुरवठा न झाल्याने शहरात लशींचा तुटवडा भासणार आहे. शहरात दररोज ५ हजार जणांना लस देण्यात येत असून फक्त ‘कोव्हिशिल्ड’च्या ३ हजार लस कुप्या शिल्लक आहेत. त्यामुळे गुरुवारी नागरिकांना लस कशी द्यायची हा प्रश्न आहे.
शहरात आतापर्यंत १ लाख १९ हजार नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले आहे. तर करोनायोद्धे तसेच ज्येष्ठ नागरिक मिळून एकूण ४ लाख ५० हजार जणांना लसीकरण करण्याचे लक्ष पालिकेने ठेवले आहे, परंतु पालिकेकडे लशींचा आवश्यक साठाच प्राप्त झाला नाही. शहरात ४२ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. यामध्ये काही खासगी तसेच काही पालिका रुग्णालयासह नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात आहे, परंतु मागील काही दिवसांपासून राज्याकडून व राज्याला केंद्राकडूनच आवश्यक लशींचा साठा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. शहरात ‘कोव्हिशिल्ड’च्या ३ हजार तर ‘कोव्हॅक्सिन’च्या १५ हजार लस कुप्या शिल्लक आहेत. मात्र शासनाच्या आदेशानुसार पहिली मात्रा ही आता ‘कोव्हिशिल्ड’ची देण्यात यावी अशा सूचना आहेत. मात्र ‘कोव्हिशिल्ड’च्या फक्त ३ हजार लस कुप्या शिल्लक आहेत. पालिका लस मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. ४२ केंद्रांवर लस दिली जात आहे. यात आणखी आठ केंद्रांची वाढ करण्यात येणार आहे. मात्र लस कुप्याच नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पालिकेकडे सध्या ‘कोव्हिशिल्ड’च्या ३ हजार तर ‘कोव्हॅक्सिन’च्या १५ हजार कुप्या उपलब्ध आहेत. पहिली मात्रा देण्यासाठी ‘कोव्हिशिल्ड’ दिले जात असून त्यांचा साठा कमी आहे. लसीकरणामध्ये खंड पडता कामा नये यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत. परंतु लशींचा साठा राज्याकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका
