४ वर्षांत २ लाख ब्रास मातीच्या उत्खननाबरोबरच झाडांचीही बेसुमार कत्तल

विकास म्हणजे काय हा प्रश्न पर्यावरणवाद्यांकडून सातत्याने विचारला जात असून विकासाच्या नावाने उरणमध्ये अनेक ठिकाणी मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. गेल्या ४ वर्षांत उरणमधील २७ गावांतील जवळपास २ लाख ९ हजार ब्रासपेक्षा अधिक मातीचे उत्खनन झाले असून झाडांचीही सर्रास कत्तल सुरू आहे. विशेष म्हणजे, हे उत्खन्नन कायदे धाब्यावर बसून रांत्रदिवस सुरू असून या संदर्भात महसूल तसेच वन विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने निसर्गाने नटलेल्या उरणच्या पर्यावरणावर त्याचे विघातक परिणाम होऊ लागले आहेत.

पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासामुळे येत्या १०० वर्षांत पृथ्वीवर मानवाला जगण्यायोग्य वातावरण राहणार नसल्याचे भाकीत शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत उद्योग निर्मितीच्या नावाखाली डोंगरांचे सपाटीकरण सुरू आहे. या विरोधात कोणी तक्रार केल्यास केवळ चौकशीचा फार्स केला जातो. सध्या उरण परिसरात दररोज दोन ते तीन हजार डंपर मातीचे उत्खनन केले जाते. यात डोंगरांचा भाग तर आहेच, शिवाय शेतजमिनीतील मातीदेखील काढली जात आहे.

या संदर्भात उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांच्याशी संपर्क साधला असता माती उत्खननासाठी प्रांताधिकाऱ्यांकडे रॉयल्टी भरण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर वन विभागाचे वन संरक्षक बी.डी.गायकवाड यांनी मातीची परवानगी आम्ही देत नाही. परंतु उत्खननात जंगल तसेच डोंगरीतील झाडे तोडण्याची परवानगी दोन्ही विभागांकडून घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेकायदा तोडीविरोधात कारवाई केल्यास आमच्या जीवाला धोका असल्याचीही भीती ते व्यक्त करत असल्यामुळे राज्यातील वाळूमाफियानंतर मातीमाफियाचीदेखील प्रशासनावर दहशत निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

उत्खनन झालेली गावे

वशेणी, कळंबुसरे, पुनाडे, चिरनेर, चिर्ले, बोरीपाखाडी, चाणजे, पोही, जासई, कोप्रीली, सारडे, जुई, दिघोडे, काळाधोंडा, फुंडे, पौंडखार, धुतूम, विंधणे, पाले, पिरकोन, वेश्वी, जांभूळपाडा, चिर्ले गावठाण व रानसई.

माती उत्खननाची प्रशासकीय आकडेवारी

२०१४- १०हजार ब्रास, २०१५- २६ हजार ६१८ ब्रास, २०१६ – १ लाख ६० हजार ९०० ब्रास तर मे २०१७ पर्यंत १२ हजार ब्रासची परवानगी देण्यात आली.