|| विकास महाडिक
पालिकेकडून चाचपणी; सल्लागार कंपनीकडून अहवाल तयार करणार:- शहरातील सार्वजनिक उपक्रमांसाठी मोठय़ा प्रमाणात होणारा वीजवापर आणि त्यावरील कोटय़वधीचे देयक (बिले) यावर पर्याय म्हणून पालिका तुर्भे येथील बंद पडलेल्या कचराभूमीतील २५ एकर जागा सौरऊर्जा निर्मितीसाठी वापरण्याचा प्रस्ताव तयार करणार आहे. यासाठी लवकरच या प्रकल्पाची शक्यता-अशक्यता अहवाल तयार करण्याचे काम एका सल्लागार कंपनीवर सोपविण्यात येणार आहे. पालिकेने यापूर्वी खालापूर तालुक्यातील मालकीच्या मोरबे धरणावर असा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता पण नंतर तो रद्द करण्यात आला.
नवी मुंबई पालिका क्षेत्रात दररोज सातशे मेट्रिक टन घनकचरा निर्माण होतो. त्याची तुर्भे येथील ८५ हेक्टर परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. पालिकेचा हा कचराभूमी प्रकल्प देश आणि राज्यात वाखणण्यात आलेला आहे. या कचराभूमीवरील चार भाग टप्याटप्याने बंद करण्यात आलेले आहेत. नवीन विभाग सुरू करण्यापेक्षा जुना भाग बंद करण्यासाठीचा खर्च जास्त आहे. सध्या पाचवा भाग बंद करण्याची प्रक्रिया सुरू असून तो येत्या दोन महिन्यांत बंद करण्यात येणार असून त्यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर सहावा भाग सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत बंद करण्यात आलेल्या भागांची २५ एकरपेक्षा जास्त मोकळी जामीन आहे.
कोपरखैरणे येथील कचराभूमी बंद करताना पालिकेने या ठिकाणी विस्तीर्ण असे उद्यान विकसित केले असून नागरिक या उद्यानाचा सध्या चांगला वापर करीत आहेत. तुर्भे येथील कचराभूमीच्या आजूबाजूला दीड लाख झोपडपट्टी वसाहतीतील लोकसंख्या असून पूर्व बाजूस औद्योगिक वसाहत आहे.
जवळच सहाव्या व त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या इतर भागांची कचराभूमी कायमची कार्यरत राहणार आहे. या बंद पडलेल्या भागांमुळे मोकळी असलेल्या जमिनीवर सार्वजनिक वापराचा प्रकल्प उभारणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे या ठिकाणी सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबाबत चाचपणी सुरू करण्यात येणार आहे. पंचवीस एकरपेक्षा जास्त जमिनीवर सौरऊर्जेतून पालिकेला उत्पन्न मिळणार आहे. केंद्र सरकार या प्रकल्पांसाठी प्रोत्साहन आणि अनुदान देत आहे. काही वर्षांपूर्वी मोरबे येथील धरण परिसरात असलेल्या मोकळ्या जमिनीवर १६३ कोटी रुपये खर्चाचा हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तो रद्द केला. मोरबेऐवजी आता तुर्भे येथील विनावापर मोकळ्या जमिनीचा पर्याय निवडण्यात आला आहे. दगडखाण भाग असलेल्या या ठिकाणी प्राथमिक अंदाजानुसार सूर्यप्रकाशाची तीव्रता चांगली असल्याने पंचवीस मेगा वाँटपेक्षा जास्त सौरऊर्जा निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही वीज महावितरण कंपनीला हस्तांतरित केल्यास पालिकेच्या नागरी सुविद्यांसाठी होणाऱ्या वीज वापरापोटी द्याव्या लागणाऱ्या दयेकातून सूट मिळणार आहे. पालिकेने स्वत:चा सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यास हे देयक कमी होणार असून पालिकेची कोटय़वधी रुपयांची बचत होईल, असा दावा केला जात आहे.
तुर्भे येथील कचराभूमीची नुकतीच पाहणी करण्यात आली. बंद पडलेल्या चार भागांमुळे या ठिकाणी विस्र्तीण अशी मोकळी जमीन आहे. ती वापराविना पडून राहणे योग्य नाही. कालांतराने त्या ठिकाणी अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. त्या जागेचा योग्य तो वापर करण्याच्या दृष्टीने विचार केला जात असून त्यात सौरऊर्जा हा एक पर्याय आहे. त्यासाठी शक्यता अहवाल तयार केला जाणार आहे. -अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई पालिका