scorecardresearch

स्वच्छोत्सव-२०२३ कार्यशाळेमध्ये नवी मुंबईतील विशेष स्वच्छता उपक्रमांची नवी दिल्लीत प्रशंसा

नवी मुंबईतील सानपाडा उड्डाणपुलाखाली राबविलेल्या ‘गेमींग झोन’ या अभिनव उपक्रमाचीही माहिती आयुक्तांनी सादरीकरणामध्ये छायाचित्रांसह दिली.

special cleanliness initiatives in navi mumbai
नवी दिल्ली येथे "स्वच्छोत्सव-२०२३"  अंतर्गत केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यशाळा संपन्न झाली

आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले नवी मुंबई महानगरपालिकेच्या ३ नाविन्यपूर्ण स्वच्छता उपक्रमांचे सादरीकरण 

नवी मुंबई- ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ३० मार्चच्या ‘शून्य कचरा दिना’चे औचित्य साधून इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे “स्वच्छोत्सव-२०२३”  अंतर्गत केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यशाळा संपन्न झाली.आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवसानिमित्त कचरामुक्त शहरासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी कचरामुक्त शहरासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम या चर्चासत्रात सहभागी होत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ३ वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना मांडल्या. आयुक्तांनी मांडलेल्या तिन्ही अभिनव संकल्पनांची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली.

हेही वाचा >>> मुंबई गोवा महामार्गावरील ४२ किलोमीटरच्या कॉंक्रीट मार्गिकेच्या बांधकामाचे गुरुवारी केंद्रीयमंत्रीच्या हस्ते भूमीपुजन

महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे नेतृत्व वृध्दींगत होण्यासाठी “स्वच्छोत्सव-२०२३”  चे राष्ट्रीय पातळीवर आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका उत्साहाने सहभागी झालेली आहे. देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहूमान संपादन करताना लोकसहभागावर विशेष लक्ष देत नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेमधील नवनवीन संकल्पनांचा उपयोग नेहमीच केलेला आहे.या अनुषंगाने कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कचरामुक्त शहरासाठी राबविण्यात येणा-या ३ नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती आयुक्तांनी सादरीकरणाव्दारे दिली. यामध्ये पहिला उपक्रम म्हणजे शाळाशाळांमधून राबविण्यात येत असलेली “ड्राय वेस्ट बँक” ही अभिनव संकल्पना. या उपक्रमांतर्गत सुक्या कच-याची योग्य रितीने विल्हेवाट लावण्याची सवय शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजवून त्यांच्यावर नकळतपणे स्वच्छतेचा संस्कार केला जात आहे. या संकल्पनेची सविस्तर माहिती देत ही संकल्पना राबविण्यात आलेले यश आयुक्तांनी देशभरातील विविध शहरांतून आलेल्या प्रतिनिधींसमोर मांडले. नागरी विकास व गृहनिर्माण विभागाच्या सचिव  रुपा मिश्रा यांनी या कार्यशाळेत संपूर्ण वेळ उपस्थित राहून देशभरात सुरु असलेल्या स्वच्छता विषयक विविधांगी उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या सादरीकरणात ‘संगीतासह विकास’ अर्थात “ग्रो विथ म्युझिक” या दुस-या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती देताना संगीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संस्कार करण्याची आगळीवेगळी संकल्पना मांडली.त्याचप्रमाणे उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभिकरण करून तसेच त्याठिकाणी विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्याचा कायापालट करण्याच्या नवी मुंबईतील सानपाडा उड्डाणपुलाखाली राबविलेल्या ‘गेमींग झोन’ या अभिनव उपक्रमाचीही माहिती आयुक्तांनी सादरीकरणामध्ये छायाचित्रांसह दिली. सुप्रसिध्द उद्योगपती  आनंद महिंद्रा यांनीही त्यांच्या ट्विटर अकांऊटवरून नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले असून इतर शहरांनीही हा कित्ता गिरवावा असे सूचित केले आहे. उड्डाणपुलाखालील अस्वच्छता दूर करून त्या मोकळ्या जागेत छोटेखानी क्रीडा संकुल उभे करण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट? मोरबे धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा

 “युथ वर्सेस गार्बेज” या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात आलेल्या “इंडियन स्वच्छता लीग” मध्ये सर्वाधिक युवक सहभागाचा राष्ट्रीय प्रथम क्रमांकाचा सन्मान नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाला असून आता “स्वच्छोत्सव-२०२३”  मध्येही व्यापक महिला सहभागाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. नवी दिल्लीतील विशेष कार्यशाळेतही महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी कचरामुक्त शहरासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या सादरीकरणाचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले. या कार्यशाळेस नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्तांसह शहर अभियंता  संजय देसाई व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे हे देखील उपस्थित होते.

कौतुक महापालिकेचे…

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या स्वच्छतेबाबतच्या विविध उपक्रमांची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते त्यामुळे आगामी काळातही स्वच्छतेच्या बाबत नवी मुंबई विविध उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने राबवण्यात येत असून उड्डाणपुलाखालील गेमिंग झोन उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. राजेश नार्वेकर आयुक्त नवी मुंबई महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 10:28 IST

संबंधित बातम्या