विद्यार्थी महापालिकेच्या सिडको प्रदर्शनी केंद्र येथील करोना रुग्णालयात दाखल,शाळेत ५ वी ते १२ वीचे १६०० विद्यार्थी

नवी मुंबई शहरातील घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे विद्यालय या शाळेतील १६ विद्यार्थी करोनाबाधित आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून या विद्यार्थ्यांना सिडको  प्रदर्शनी केंद्र येथील करोना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे. परंतू एकाच शाळेतील १६ विद्यार्थी करोनाबाधित झाल्यामुळे पुन्हा एकदा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेतील काही आठवी व काही नववीच्या वर्गातील हे विद्यार्थी असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. या शाळेतील एका ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील कतार येथून परतले होते. त्यावेळी त्यांची व घरातल्या सदस्यांची करोना चाचणी केली असता आई वडिलांची चाचणी निगेटिव्ह आली तर शेतकरी शिक्षण संस्थेत ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची चाचणी सकारात्मक आल्याने एकच खळबळ उडाली. हा विद्यार्थी शाळेत आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील सर्वच विद्यार्थ्यांची चाचणी करावी लागणार आहे. ही शाळा दोन सत्रात भरते. त्यामुळे ११ वीचे वर्ग भरतात त्याच ठिकाणी दुसऱ्या सत्रातील ९ वीचे विद्यार्थी बसतात. त्यामुळे पालिकेने या शाळेतील ३८९ विद्यार्थांची चाचणी केली असता १६ विद्यार्थी करोनाबाधित आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाळेत जवळजवळ १६०० विद्यर्थी शिक्षण घेत असून शाळेतील गुरुवारी ७ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली असून शुक्रवारी ९ विद्यार्थी करोनाबाधित झाले आहेत. शाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे वर्ग असून शाळेत त्यातील ३८९ विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात आली असून संपर्कातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील ८वीच्या पुढील विद्यार्थ्यांच्या माध्यमिक विभागाच्या शाळा ४ ऑक्टोंबरला तर नवी मुंबई शहरातील १ ली ते ७ वीच्या शाळा नुकत्याच ३ दिवसापूर्वी १५ डिसेंबरला सुरु झाल्या आहेत. त्यामुळे एकाच शाळेतील १६ विद्यार्थी करोनाबाधित आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा शाळा व विद्यार्थी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या प्रथम विद्यार्थ्यामुळे इतर विद्यार्थी करोनाबाधित झाले आहेत, त्याची जिनोम सिक्वेन्स चाचणीसाठी नमुने पुण्याला पाठवण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लोकसत्ताला दिली आहे.

नवी मुंबईतील घणसोली शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेतील १६ विद्यार्थी करोनाबाधित आढळले आहेत.ह्या विद्यार्थ्यांना  सिडको प्रदर्शनी केंद्र येथील करोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.शाळांनी करोना नियमावली व सुक्षेबाबत अधिक खबरदारी घ्यावी.

  • प्रमोद पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका

११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील कतारहून परतले होते.त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता आई वडील निगेटीव्ह तर शेतकरी  शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलाची चाचणी सकारात्मक आल्याने इतर विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली असून त्यात १६ विद्यार्थी करोनाबाधित आढळले आहेत. त्यांना पालिकेच्या वाशी सिडको प्रदर्शनी येथील करोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

  • आर.बी.जाधव, मुख्याध्यापक, शेतकरी शिक्षण संस्था विद्यालय, घणसोली