वर्षअखेरीस वाटपाची पालिकेला घाई

संतोष जाधव, नवी मुंबई  

गेल्या वर्षी शासनाच्या थेट लाभार्थी योजनेमुळे अनेक महापालिका विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही तर या वर्षी पालिका प्रशासनाने केलेल्या दप्तरदिरंगाईमुळे वर्षभर पालिकेच्या विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाविनाच शाळेत जावे लागले. आता परीक्षांचा कालावधी सुरू झाल्यानंतर शाळेचे काही दिवस उरले असताना गणवेशवाटपाची घाई सुरू झाली आहे.

शाळेच्या शेवटच्या दिवसात हा गणवेश वाटप केला जात असला तरी पुढील वर्षी या गणवेशाचा वापर करता येणार असल्याचे पालिकेचे शिक्षण अधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेने या शैक्षणिक वर्षांच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय गणवेश वाटप करण्याची तयारी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. परंतु नवे स्वरूप निश्चित करण्यात दिरंगाई झाली आणि पालिकेचे मनसुबे फसले. त्यानंतर शासनाने आपली थेट लाभार्थी योजना मागे घेततली. त्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून प्रस्तावाला समित्यांची मंजुरी करीत करीत शैक्षणिक वर्षे संपताना ८ कोटी १२ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. यालाही महिना उलटल्यानंतर आता गणवेशवाटपाची घाई सुरू आहे. त्यामुळे शेवटचे १५ ते २० दिवस विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळणार आहे. या वर्षी पालिकेच्या शाळांत २ हजार ३५१ विद्यार्थी असून त्यांचा शेवटचा पेपर राहिला आहे. त्यांना तर यंदा गणवेश नशिबीच नाही.

आचारसंहिता भंगाची तक्रार

प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे कामाचे आदेश नसताना निवडणूक काळात गणवेशवाटप सुरू आहेत. हा आचारसंहितेचा भंग असून याविरोधात शासनाच्या निवडणूक आचारसंहिता विभागाकडे तक्रार करून कारवाईची मागणी परिवहन सदस्य सुधीर पवार यांनी केली आहे. याबाबत या कामाला कार्यादेश देण्यात आला नसल्याचा आरोप चुकीचा असून कामाच्या स्वीकृतीच्या वेळीच संबंधित ठेकेदाराला वाटपाची व कामपूर्णत्वाची मुदत दिली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची आचारसंहिती भंग नसल्याचे शिक्षणध्ग्किाऱ्यांनी सांगितले.

नव्या स्वरूपात गणवेश

शालेय गणवेशात बदल करण्यात आला असून निफ्ट संस्थेने तयार केलेल्या रंगसंगतीप्रमाणे नव्या गणवेशाचे वाटप करण्यात येत आहेत. याामध्ये पूर्वप्राथमिक विभाग, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभागातील सर्वाना शालेय गणवेश, पीटी गणवेश व ३ री व ५ वीच्या स्काऊट गाइडचा गणवेश मोफत दिला जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या दिरंगाईमुळे गणवेश वाटपाला उशीर झाला आहे. तसेच निवडणुकीच्या काळांमध्ये मोफत गणवेशवाटप केले जात असल्याबद्दल आरोप करणे चुकीचे असून रितसर नियमानुसार ही गणवेश वाटप प्रक्रिया सुरू आहे.

– जयवंत सुतार, महापौर