नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली आणि सविता केमिकल येथील उड्डाणपुल तसेच महापे येथील भुयारी मार्गाचे राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते दीड वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. त्यानंतर पहिल्याच पावसाळ्यापासून या भुयारी मार्गात सातत्याने पाणी साचत आहे.
त्यामुळे एमएमआरडीए आणि पालिकेने याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
ठाणे-बेलापुर मार्गावरून ठाण्याच्या दिशेकडून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गासाठी महापे सर्कलजवळ होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्ग (अंडरपास) बांधण्यात आला, मात्र भुयारी मार्गात पावसाळा संपला तरी पाणी साचणे बंद झालेले नाही. त्यामुळे अनेक छोटेमोठे अपघात होत आहेत.
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात वाहनांमध्ये पाणी जाऊन बंद पडण्याच्या घटना घडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे भुयारी मार्गापासून घणसोली पर्यत वाहनांच्या लांबच लांब पाहायला मिळत होत्या. पावसाळा सरत आला तरीमार्गातील पाणी बंद झालेले नाही. या मार्गाची अनेकदा डागडुजी करण्यात आली आहे. मात्र तरीही पाणी साचण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. खाडीतील पाण्याच्या पातळीपेक्षा भुयारी मार्गाची जमिनीची पातळी अधिक खोल आहे. त्यामुळे पाणी साचण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने रबाळे ते घणसोली हा दीड किलोमीटर अंतराचा, तर पावणे येथील सविता केमिकल जवळ ४८५ मीटरचा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापे येथे ठाण्याहून बेलापूरकडे जाण्यासाठी ४८५ मीटरमध्ये तीन मार्गिका असणारा भुयारी मार्ग बांधला आहे. या दोन उड्डाणपुल आणि भुयारी मार्गासाठी एमएमआरडीएकडून जवळजवळ १६६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र भुयारीमार्गासाठी कोटय़वधींचा खर्च केल्यानंतर भुयारी मार्गात पाणी साचणे सुरूच आहे.
महापे येथील भुयारी मार्ग-६ महिन्यापूर्वीच पालिकेकडे हस्तांतरीत केलेला आहे, परंतु भुयारी मार्ग एमएमआरडीएकडून हस्तांतरीत करण्यावेळी दोष निवारण कालावधी पाच वर्षांचा आहे. त्यामुळे या ठिकाणची तांत्रिक दुरुस्ती करण्याचे काम एमएमआरडीए करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भरतीच्यावेळी सातत्याने पाणी साचत असल्याने एमएमआरडीए याची तांत्रिक दुरुस्ती करून देणार आहेत.
-संजय देसाई, कार्यकारी अभियंता नवी मुंबई पालिका