बाजार समितीच्या शुल्कात ३०-४० टक्क्यांची घसरण

राज्यातील जिल्हा बँकाप्रमाणे बाजार समित्यांनाही हजार पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास सरकारने बंदी घातल्याने बाजार समित्यांच्या शुल्कात लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ, भाजी व कांदा बटाटा बाजारात दररोज जमा होणारे बाजार शुल्क ३०-४० टक्क्यांनी कमी झाले आहे. नाशिवंत शेतमाल असणाऱ्या भाजी बाजारात आजही जुन्या नोटा स्वीकारल्या जात असून त्या शेतकऱ्यांना दिल्या जात असल्याचे समजते.

आठ नोव्हेंबरला केंद्र सरकारने चलनातील हजार पाचशेच्या नोटा बंद केल्या. त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी व व्यापाऱ्यांना बसला आहे. तुर्भे येथील एपीएमसीच्या धान्य, मसाला व कांदा बाजारातील व्यापारी हे पूर्वीपासून धनादेशाद्वारे बाजार शुल्क भरीत आहेत. त्यामुळे त्यांना हे बाजार शुल्क भरण्यात अडचणी येणार नाहीत. मात्र फळ बाजारातील ग्राहकांच्या माध्यमातून एपीएमसीकडे येणाऱ्या बाजार शुल्कात कमालीची घट झाली आहे. देश व राज्याच्या विविध जिल्ह्य़ांतून येणाऱ्या शेतमालावर एपीएमसी बाजार शुल्क म्हणून १०० रुपयांच्या व्यापारावर ७५ पैसे अडत्याकडून घेतले जाते. यात पाच पैसे देखभाल शुल्काचा समावेश केला गेला आहे. घाऊक बाजारपेठेतील चार बाजारपेठा व्यापारी व अडत्याच्या माध्यमातून बाजारशुल्क थेट बाजार समितीकडे जमा करतात. पण फळ बाजारातील बाजार शुल्क हे खरेदीदार मापाडींच्या माध्यमातून रोखीने शुल्क समितीकडे जमा करतात. त्यात घट झाल्याचे फळ बाजारातील अधिकाऱ्यांनी सांगितले. फळ बाजारात रोज जमा होणारे अडीच लाखांचे हे बाजार शुल्क आता दीड लाखापर्यंत खाली आले आहे. गेल्या १५ दिवसांतील नोटाबंदीमुळे हा परिणाम दिसून आला आहे. फळ बाजारात हे बाजार शुल्क रोखीने प्रवेशद्वारावर वसूल केले जाते. त्यामुळे त्यात घट झाली आहे. बाजारपेठांतील बाजारातही गेल्या १५ दिवसांत कमी व्यवहार झाल्याने त्यांचे या महिन्याचे जमा होणारे बाजारशुल्क घटणार आहे.

राज्यातील बाजार समित्या शासनाचाच एक भाग असूनही तिथे बाजारशुल्क जुन्या नोटांच्या स्वरूपात स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. पालिकेचे कर, महावितरण कंपनी शुल्कासाठी जुन्या नोटा स्वीकारण्यात आल्याने या प्रधिकरणांच्या तिजोरीत बरीच वाढ झाली, मात्र राज्यातील ३५० बाजार समित्यांत ही मुभा न देण्यात आल्याने बाजार समित्यांचे उत्पन्न घटले आहे. याचा परिणाम बाजार समित्यांच्या व्यवस्थापनावर होणारा आहे. भाजी बाजारात येणाऱ्या भाजीसाठी नवीन नोटा देण्याची अद्याप कोणतीही व्यवस्था न झाल्याने व्यापारी शेतकऱ्यांना काही जुन्या तर काही नवीन नोटा देत असल्याचे समजते. जुन्या नोटा शेतकरी त्यांच्या बँकेत भरण्यास तयार असल्याने व्यापाऱ्यांनी या नोटा  देणे सुरू ठेवले आहे.

फळ बाजारातील बाजार शुल्क हे रोखीने जमा केले जाते. गेले १५ दिवस बाजार ३०-४० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे समितीच्या तिजोरीवरही परिणाम झाला असून बाजारशुल्क घटले आहे.

संजय पानसरे, फळ बाजार, एपीएमसी, नवी मुंबई

एपीएमसीच्या पाच घाऊक बाजारांतील चार बाजारपेठांत बाजारशुल्क धनादेशाद्वारे समितीकेड जमा होते. बाजार समितीला मिळणारे हे शुल्क वार्षिक ६० ते ६५ कोटी रुपयांचे आहे. बाजारातील आर्थिक उलाढाल कमी झाली की त्याचा परिणाम या शुल्कावर होतो.

अविनाश देशपांडे, सहसचिव, एपीएमसी, नवी मुंबई