३६ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोने जप्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : घरगुती अडचणी सोडविण्यासाठी सुवर्णपूजेचा बहाणा करून लाखो रुपयांचे सोने चोरणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केले आहे. त्याच्याकडून तब्बल ३६ लाख १० हजाराचे ९५४ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. अशा पद्धतीने फसवण्यात आलेल्या लोकांनी आपआपले सोने परत घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.

अजय जंगम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बोलण्यात अत्यंत लाघवी असून सराईत आरोपी आहे. जुजबी ओळख काढून किवा थेट घरात जाऊन तो लोकांना भेटत होता. त्यांना स्वत:ची ओळख ज्योतिषी असे सांगत होता. आरोपी मोबाइलचा वापर करीत नसल्याने त्याचा शोध लागत नव्हता. अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याची नोंद पनवेल, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात झाली होती. हाच धागा धरून पोलीस नाईक नवनाथ कोलकार यांनी जंगमबाबत माहिती मिळवली.

या आधारावर सानपाडा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर, अंमलदार शशिकांत शेडगे, नवनाथ कोलकार, युवराज जाधव यांच्या पथकाने सापळा रचून जंगम याला ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली दिल्यावर त्याला अटक करण्यात आले. त्यानेच दिलेल्या माहितीवरून त्याच्या घरातून तसेच ज्या ठिकाणी गहाण ठेवले तेथून  सोने जप्त करण्यात आले आहे. यात ९५४ ग्रॅम सोन्याचे दागिने असून त्यात अजूनही भर पडण्याची शक्यता आहे.

आरोपी हा कामोठे येथील एलोरा हाईट्स या आलिशान टॉवरमध्ये राहत असून स्वत:ला व्यापारी म्हणवून घेत होता. तो आलिशान गाडी वापरत होता. गुन्हा करताना कुठलाही मोबाइल वापरत नसणारा प्रत्यक्ष जीवनात मात्र आय फोन मोबाइल वापरत होता. त्याच्याकडून फसवले गेलेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भूलथापा देऊन गंडवागंडवी

समोरच्या व्यक्तीचा एकदा विश्वास बसला की, तुमचे संकट दूर करायचे असेल तर सुवर्णपूजा आवश्यक असल्याच्या भूलथापा देत होता. या सुवर्णपूजेसाठी ज्याच्या नावाने पूजा करावयाची आहे त्याच्याकडील सोने घेत होता. त्याची पूजा २१, ११, ५ असे मनाला येईल तेवढे दिवस पूजा सुरू राहणार असून पूजा मंदिरात वा त्याच्या स्वत:च्या घरी केली जाईल असे सांगत होता. त्यानंतर एकदा सोन्याचा दागिने घेऊन गेला की तो पुन्हा त्या परिसरात काही आठवडे तरी फिरकत नव्हता. हेच सोने गहाण ठेवून जास्तीत जास्त पैसे घेऊन जात होता व पुन्हा सोने सोडवतही नव्हता.

१५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. फसवणूक झालेल्यांनी दागिन्याची ओळख पटवून ते घेऊन जावे. त्यासाठी पोलीस ठाणे अथवा गुन्हे प्रगटीकरण शाखा सीबीडी येथेही संपर्क करावा. -एन. बी. कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा)

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suvruna pooja fraud arrest akp
First published on: 23-01-2020 at 00:42 IST