सेवाज्येष्ठतेचे नियम डावलल्याचा शिक्षक संघटनेचा नवी मुंबई पालिकेवर आरोप
नवी मुंबई महापालिका शाळेतील दोन शिक्षकांना सेवाज्येष्ठतेचे नियम डावलून पदोनत्ती देण्यात आल्यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अन्य शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
रमेश तेली यांची मराठी माध्यमाचे शिक्षक म्हणून १९८८साली महापालिकेत नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर हिंदी माध्यमात प्रतिनियुक्ती करण्यात आली. २००० च्या सेवा ज्येष्ठता यादीत त्यांचे नाव होते. ते हिंदी माध्यमाच्या यादीत सामील करण्यात आले होते. हिंदी माध्यमातून त्यांना पदोन्नती देण्यात आली. ८४-८५ साली नियुक्ती झालेले शिक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असताना ८८ साली रुजू झालेल्या तेली यांना पदोन्नती देण्यात आली. शिवाय ज्या माध्यमात नियुक्ती झाली त्याच माध्यमात पदोन्नती देण्यात यावी, असा नियम आहे. तो मोडण्यात आल्यामुळे मराठी माध्यमाच्या शिक्षकांबरोबरच हिंदी माध्यमाच्या शिक्षकांवरदेखील अन्याय झाल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
मारुती गवळी यांची नियुक्ती १९९१ मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करून सेवेत असताना बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याला मान्यता देऊन पदवीधर श्रेणी दिली. २००४ साली माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी ९ शिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यानंतर मारुती गवळी वगळता उर्वरित शिक्षकांना पूर्ववत पदावर रवाना करण्यात आले. या वेळी कोणताही विकल्प न भरता पूर्वलक्ष्यी प्रभावाचे कारण पुढे करत गवळी यांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. सेवाज्येष्ठता यादीत त्यांचा समावेश करून मुख्याध्यापक वेतनश्रेणी दिली. बी.एड. हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी ९ महिने रीतसर रजा घेऊन शिक्षण घेण्यात येते. पार्टटाइम बी.एड.चा कालावधी दोन वर्षांचा असतो. एखादा शिक्षक कामावर रुजू असताना बी.एड.ची पदवी घेणे हे चुकीचे असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी संदीप सांगवे यांच्याशी संपर्क साधला असता आधीच्या अधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतले, हे मला सांगता येणार नाही. याबाबत माहिती काढण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
रमेश तेली यांची पदोन्नती तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानुसार झाली. त्यानंतर या विभागात त्यांनी १०-१२ वर्षे सेवा केली. या शाळेत आधीच १३ शिक्षकांची कमतरता आहे. त्यात ऐन परीक्षेच्या काळात मुख्याध्यापकांची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांना फटका बसला असता. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर बदली करावी, असे पत्र मी प्रशासनाला पाठवले होते.
– सुधाकर सोनावणे, महापौर
