पनवेल : पनवेल महापालिकेने पालिका हद्दीत सुरू असलेली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पनवेलच्या ग्रामीण भागात हाती घेतलेली रस्ते, नाले आणि लहान पुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन केल्याची माहिती दिली. ३१ मेपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि २५ मे पूर्वी पनवेल महापालिकेने या तारखापूर्वी ही कामे पू र्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपनीला तशा सूचना दिल्याचे सुद्धा अधिका-यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सध्या वावंजा ते चिंध्रण गावापर्यंत काम सुरू आहे. तसेच टेंभोडे ते वलप मार्गामध्ये तीन ठिकाणी लहान पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. चार दिवसांपूर्वी पडलेल्या पावसात कोळवाडी येथील लहान पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता शेतातून वळवला आहे. अचानक पडलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये येथे चिखल झाला आणि दोन दुचाकींची चाके त्या चिखलात घसरून चालक पडले. पडलेल्यांमध्ये एक दुचाकीस्वार पोलीस होते.
अशाच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने वावंजे ते चिंध्रण या मार्गावर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र या मार्गावरुन चारचाकी व मोठे ट्रक जाण्यासाठीचा मार्ग शेतकऱ्यांनी खुला न ठेवल्याने देवीचापाडा येथील अरुंद रस्त्यावरुन वळसा प्रवास करुन जावे लागत आहे.
पनवेल महापालिका प्रशासनाने २५ मेपूर्वी डांबरीकरणाचे हाती घेतलेल सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्या संदर्भातील सूचना पालिकेच्या कंत्राटदार कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी कॉंक्रीटीकरणाचे जेथे काम पूर्ण झालेत ते रस्ते खुले केले जातील. कमी पावसात जेथे काम करणे शक्य आहे तेथे सुद्धा काम करण्याचे नियोजन आहे. – संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महापालिका
३१ मेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने पनवेल ग्रामीण परिसरात हाती घेतलेली विकासकामे पुर्ण करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. तशा सूचना सुद्धा संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या आहेत. काम सुरू असताना अन्य ठिकाणाहून वाहने जाण्यासाठीचे नियोजन आम्ही रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना घेऊन केले आहे.- मिलिंद कदम, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल