उरण : उलवे नोडमधील अटलसेतुला जोडणाऱ्या खारकोपर रेल्वे स्थानकानजीकच्या शांतादेवी चौकात प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गाने ये जा करणारे प्रवासी आणि वाहनचालकांना चिखलमय मार्गातून प्रवास करावा लागत आहे. हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत अशी मागणी या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.
१२ जानेवारी २०२४ ला देशातील सर्वात लांबीच्या सागरी महामार्गाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले आहे. मुंबई व नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या या महत्वाच्या सागरी पुलावरून दररोज ४० हजाराहून अधिक वाहने प्रवास करीत आहेत. मुंबई वरून येणाऱ्या वाहनांना उलवे नोड मधील खारकोपर येथे पहिला मार्ग आहे. या खारकोपर रेल्वे स्थानकांच्या मार्गावर हा चौक आहे. या चौकत उरण, पनवेल, नवी मुंबई तसेच उलवे नोड मधील मुंबईत जाणारी वाहने प्रवास करीत आहेत. याच मार्गाच्या खालच्या भागात हे चार ते पाच फूट रुंदीचे आणि किमान अर्धा फूट खोली असलेले भले मोठे खड्डे पडले आहेत. याच मार्गावर काही महिन्यांपूर्वी काँक्रीटच्या मार्गाला भेगा पडल्या होत्या. त्यानंतर हे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे न्हावा, शिवाजी नगर, कोपर तसेच गव्हाण गावातील स्थानिक नागरिकांनाही चिखलातून प्रवास करावा लागत आहे. याच मार्गाच्या शेजारी सिडकोच्या घरांचेही काम सुरू आहे. या कामातील मातीचे ठिगारे मार्गाच्या कडेला आहेत. यातील माती मार्गात वाहून येत आहे. त्यामुळे या रहदारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. तर अटलसेतुकडे येणाऱ्या जासई ते गव्हाण या मार्गाचीही दुरवस्था झाली आहे.
जासई नाका येथील तलाव, गव्हाण रेल्वे स्थानक मार्ग, आकसा मार्ग, गव्हाण गावातून जाणारा मार्ग येथेही खड्डे पडले आहेत. या मार्गाने जड व कंटेनर वाहतूकही सुरू आहे. त्यामुळे या खड्ड्यात भर पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गाचे काही प्रमाणात काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.मात्र मार्गा लगतच्या डोंगरातून येणारे पाणी थेट मार्गातून वाहत असल्याने खड्डे अधिक वाढू लागले आहेत. डोंगराच्या मार्गाने येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था निर्माण न केल्याने या खड्ड्यांचा सामना येथील दुचाकस्वारांसह या मार्गाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनाही करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे टप्प्या टप्प्याने सुरू केलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी येथील रिक्षाचालकाकडून करण्यात येत आहे.
अटलसेतुवरील एनएमएमटी बसला प्राधान्य :
एनएमएमटी ने नेरुळ अटलसेतु मार्गे मुंबई अशी बस सेवा सुरू केली आहे. याचा फायदा नवी मुंबई आणि उलवे नोड मधील मुंबईत नोकरी व्यवसाय करणाऱ्या प्रवाशांना झाला आहे. या बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
उरण ते मंत्रालय अटलसेतु मार्गे बस सुरु करण्याची मागणी :
अटलसेतु मुळे उरण ते मुंबई या मार्गातील अंतर कमी झाले आहे. त्यामुळे उरणच्या प्रवाशांसाठी उरण ते मंत्रालय अटलसेतु मार्गे एनएमएमटी बस सेवा सुरू करण्याची मागणी वर्षभरापासून केली जात आहे.
प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग :
अटलसेतुवर जाणाऱ्या या मार्गावरून उरणच्या दिशेने ये जा करणारी प्रवासी वाहतूक ही केली जात आहे. यात एसटी बस तसेच रिक्षा ही वाहतूक करीत आहेत. या सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही खड्ड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.