लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई: नवी मुंबई शहरात दळणवळणाच्या जास्तीत चांगल्या सुविधा देण्याबरोबरच नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने वॉकॅबिलिटी वाढवण्यासाठी नवी मुंबई शहरात सातत्याने विविध प्रकल्प राबवले जात आहेत. शहरातील नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी पालिकेने १ नोव्हेबर २०१८ पासून राबवलेल्या युलू सायकल व ई-बाइक्स प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून करोनाच्या काळात व त्यानंतर मात्र नागरिकांचा कल सायकलकडून ई-बाइक्सकडे वळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनसायकलप्रणाली व नवी मुंबईत पुन्हा एकदा नव्या जोमाने ई-बाइकप्रणाली सुरू झाली आहे.

दुसरीकडे शहरात हव्या तिथे बाइक उभ्या करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून सातत्याने असे प्रकार आढळल्यास सदर व्यक्तीला २०० रुपये दंड तसेच त्याचा रजिस्टर नंबरही रद्द करण्यात येत असताना आता या युलू बाइकची तोडफोड करतानाचा सानपाडा येथील व्हिडीओच समोर आला आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमातील युलू बाइकची तोडफोड करणाऱ्यांविरोधात पालिकेने गुन्हा दाखल करावा अन्यथा मनसे स्टाइलने तोडफोड करणाऱ्यांना चोप दिला जाईल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा…. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक नियमनासाठी जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना

सध्या शहरात जवळजवळ ४०० नव्या ढंगातील ई-बाइक्स सुरू आहेत. नवी मुंबईकरांचा युलू सायकल व ई-बाइक्स प्रकल्पाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असताना नागरिकांचा ई-बाइक्स वापरण्याकडे कल असून या बाइकचा नियमबाह्य वापर करण्यात येत आहे. ई-बाइक्स घेतल्यानंतर ती या बाइक्सचे स्टॅण्ड असलेल्या ठिकाणीच पुन्हा पार्क करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच वेळा या बाइक विविध ठिकाणी उभ्या केलेल्या पाहायला मिळतात. तर काही ठिकाणी या बाइकची तोडफोड झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

हेही वाचा…. VIDEO : “अमित शाहांना वेळ नसल्याने जर…”, उष्माघातामुळे ११ जणांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंची टीका

सध्या शहरात अनेक ई-बाइक्स ठेवण्यात आल्या आहेत. शहरात ई-बाइक्सचा वापर चांगला होत असून दुसरीकडे हव्या तिथे ई-बाइक्स पार्क करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कंपनीचे बारीक लक्ष असून अशा व्यक्तींना फोनद्वारे सूचना देण्यात येत असून वारंवार अशा चुका केल्यास त्या व्यक्तीची नोंदणीच रद्द केली जात आहे. युलू ई-बाइक्सच्या तोडफोडीचे प्रकार एपीएमसी, नेरुळ, बेलापूर विभागात झाले आहेत. त्याची माहिती पोलिसांना दिलेली आहे. ही सुविधा नागरिकांसाठी असून तिचा योग्य पद्धतीने वापर करण्याची आश्यकता आहे. – विकास शिंदे, व्यवस्थापक युलू ई-बाइक्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी सानपाडा सेक्टर-४ येथे शहरातील युलू ई-बाइक्सची तोडफोड काही तरुणांकडून करण्यात येत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही युलू बाइक्स नागरिकांना उपयुक्त ठरत असून या युलू बाइक्सची तोडफोड करणाऱ्यांवर पालिकेने गुन्हे दाखल करावेत अथवा अशा विक्षिप्त प्रकार करणाऱ्यांना मनसे स्टाइलने चोप देण्यात येईल. – योगेश शेटे, मनसे उपशहर अध्यक्ष ,नवी मुंबई