नवी मुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी  बसने पुढे जाण्यास जागा न दिल्याने एका दुचाकी स्वाराने जागा मिळताच बस पुढे जात बस थांबवली. गाडीत जबरदस्तीने प्रवेश करीत त्याने बसचे रिमोट पळवले. हि घटना गुरुवारी सकाळी नवी मुंबईतील ऐरोली येथे घडली आहे. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात संबंधित दुचाकी स्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजकाल जो तो घाईत असतो. आपल्या पुढे जी गाडी असेल त्याच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो. आणि समोरील गाडी चालकाने कुठल्याही कारणाने पुढे जाण्यास जागा दिली नाही तर अनेक चालकांची शिवीगाळ सुरु होते , तर अनेकदा वाद भांडणे हि होतात. . असे प्रकार अनेक ठिकाणी सहज पाहावयास मिळतात. असाच काहीसा विचित्र प्रकार गुरुवारी नवी मुंबईत घडला आहे. राज्य परिवहन महामंडळाची सातारा ते ठाणे हि शिवशाही ई बस ऐरोली मार्गे ठाणे येथे जात होती.

सकाळी साडे आठ च्या सुमारास गाडी ऐरोली येथील दिवा सर्कल येथे पोहचली. मात्र काही अंतरापासून एका दुचाकी स्वार या राज्य परिवहन महामंडळाची इ बस असलेल्या  शिवनेरी गाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र ठाणे बेलापूर मार्गावरून ऐरोलीत शिरल्यावर रस्ता त्या मानाने अरुंद असल्याने हॉर्न ऐकूनही बस चालकाला दुचाकी स्वाराला पुढे जाण्यास जागा देता आली नाही . पुढे दिवा सर्कल हा चौक मोठा असल्याने दुचाकी स्वाराने गाडी जोरात चालवत बसच्या पुढे नेत बस थांबवली.

बस चालकाच्या सोबत हुज्जत घालत बसच्या डॅश बोर्ड वर ठेवण्यात आलेले २० हजार रुपये किमतीचे रिमोट घेत पळून गेला. दरम्यान एम एच ४३ / ४१६१ हा दुचाकीचा क्रमांक बस चालकाने लक्षात ठेवत पोलिसांना दिला. मात्र बस मध्ये प्रवासी असल्याने आणि सुदैवाने बस सुरु असल्याने गाडी थांबवणे शक्य नव्हते. तसेच गाडी बंद केली तर रिमोट नसल्याने सुरु करणे शक्य नव्हते. त्यामुळे बस चालकने ठाणे डेपो येथे जात प्रवाशांना उतरवले. रात्री आठच्या सुमारास रबाळे पोलीस ठाणे गाठले. याबाबत तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्या दुचाकी स्वाराचा शोध सुरु असून या प्रकरणी  पोलीस उपनिरीक्षक युनूस शेख तपास करीत आहेत.