रबाळे पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करीत तबल १९ गुन्ह्यांची उकल केली आहे. या प्रकरणी ६ लाख ५० हजार रुपयांच्या २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांतर्गत त्याच्या नावावर ४६ दुचाकी गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच त्याला हद्दपारही करण्यात आले होते. नासीर खान (५८) असे आरोपीचे नाव असून त्याचे स्वतःचे गँरेज आहे. गेल्या काही दिवसांपासून रबाळे पोलीस ठाणेअंतर्गत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. चोर पैशन प्रो, बजाज पल्सर, एजर मोटार सायकल व स्कूटी अशा सर्व प्रकारच्या दुचाक्या चोरी करीत होता. त्यामुळे चोरटा हा दुचाकींची चांगली माहिती असलेला असावा व गुन्हे पद्धत पाहता तो एकच असावा, असा अंदाज पोलिसांना होता. त्या अनुशांघाने तपास सुरू करण्यात आला. यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. डी. ढाकणे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बी. एन. औटी यांच्या नेतृत्वाखाली एका पथकची स्थापन करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक दीपक खरात, नामदेव मानकुम्बरे, पोलीस हवालदार दर्शन कटके, पोलीस नाईक गणेश वीर, पोलीस शिपाई यादवराव घुले, प्रवीण भोपी आणि मनोज देडे यांचा समावेश करण्यात आला. हेही वाचा - नवी मुंबई : माथाडींच्या लाक्षणिक संपाने एपीएमसीत शुक-शुकाट, पाचही बाजारांतील १०० टक्के व्यवहार ठप्प पथकाने दुचाकी चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडणाऱ्या ठिकाणी सातत्याने लक्ष ठेवणे, गस्त वाढवणे यावर भर दिला. २२ जानेवारीला एक संशयित हातात पिशवी घेवून ऐरोली रेल्वे स्टेशनसमोर पार्क असणाऱ्या दुचाकीला काही तरी करीत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलीस पथकाने त्याला वेळ न दवडता पकडले. त्याच्या पिशवीत विविध प्रकारच्या दुचाकीच्या किल्ल्या आढळून आल्यावर तो चोर असल्याची खात्री पटली व त्याला अटक करण्यात आले. अटक केल्यावर पोलिसी हिसका बसताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण साडेसहा लाखांच्या २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यात केवळ रबाळे पोलीस ठाणेअंतर्गत चोरी केलेल्या १९ दुचाकींचा समावेश आहे. आरोपीचे स्वतःचे गोळीबार रस्ता घाटकोपर येथे फ्रेंड्स नावाचे गँरेज असून तो उत्तम मेकॅनिक असल्याचेही समोर आले. वाशी, खारघर, नेरूळ सीबीडी बेलापूर तसेच अंधेरी मेघवाडी, आझाद मैदान, पवई पार्क, पतंग नगर, कासारवाडी या ठिकाणांहून ४६ दुचाकी चोरी केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यापूर्वी वाशी पोलिसांनी त्याला नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले होते. या शिवाय घटनेच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता तोच चोरी करत असल्याचे काही ठिकाणी आढळून आले. हेही वाचा - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्ती? आरोपी हा दुचाकी चोरी करण्यात निष्णात असून केवळ दोन तीन मिनिटांत गाडीची बनावट किल्ली वापरून गाडी सुरू करून घेऊन जात होता. त्याच्या गँरेजवर दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्यांना चोरी केलेल्या गाड्यांचे सुटे भाग तो बिनदिक्कत वापरत होता. तसेच चोरी केलेली एखादी गाडी चांगल्या अवस्थेत असेल तर चेसी क्रमांक बदलून गाडी विक्रीही तो करीत होता. या शिवाय गाड्यांचे सुटे भाग काढून अन्य गाड्यांना लावल्यावर सुटे भाग काढलेली गाडी भंगारात विकून टाकत होता.