नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीसाठी ९२ मीटर उंचीची उलवा टेकडी येत्या दीड वर्षांत आठ मीटपर्यंत कातरली जाणार आहे. या कामाला महिनाअखेरीस सुरुवात होणार असून डिसेंबपर्यंत विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाची आंतरराष्ट्रीय निविदा काढली जाणार आहे. या निविदेसाठी चार कंत्राटदार पात्र ठरले आहेत. कोणत्याही स्थितीत पुढील वर्षांत विमानतळाच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने सिडकोने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्तांना बांधकामाची कंत्राटे देता यावीत, यासाठी एका कार्यशाळेचे आयोजनदेखील करण्यात आले होते. डिसेंबर २०१९ पर्यंत या विमानतळावरून पहिले उड्डाण होईल, असे आश्वासन सरकारने दिलेले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे उड्डाण व्हावे, यासाठी सर्व सोपस्कार अंतिम टप्प्यात आले असून सिडकोने धावपट्टीला अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या कपातीचे काम एका कंत्राटदाराला दिले आहे. ही टेकडी तोडताना वरचा ओवळा आणि वाघिवली येथील ग्रामस्थांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी प्लाझा व ब्लास्टिंग तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यात प्लाझा तंज्ञज्ञान हे खर्चीक असल्याने आवश्यक ठिकाणी तंत्रज्ञान वापरले जाणार असून इतर ठिकाणी ही टेकडी पारंपरिक पद्धतीने तोडली जाणार आहे.
या कामाला या महिन्यात सुरुवात होणार असल्याने नवी मुंबईतील अनेक स्थित्यंतरांची साक्ष असलेली ही टेकडी येत्या १८ महिन्यांत नामशेष होणार आहे. विमानतळ प्रकल्पातील पहिल्या टप्प्यासाठी एकूण ४ हजार ४७६ कोटी रुपये खर्च होणार असून संपूर्ण प्रकल्प पंधरा हजार कोटींच्या घरात जाणार आहे. या ठिकाणी हरित धावपट्टी उभारली जाणार असून त्यासाठी दोन हजार ६२५ कोटी रुपये खर्च होणार आहे. यात या टेकडीची उंची कमी करण्याच्या कामाचा समावेश आहे. टेकडी कमी करताना निर्माण होणारी माती इतरत्र भरावासाठी टाकली जाणार असून हे काम मिळावे यासाठी पनवेल, उरण तालुक्यातील राजकारण्यांनी देव पाण्यात सोडले असून सिडकोने प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.