निवडणूक काळात पालिकेचे दुर्लक्ष; सामासिक जागांवर दुकानदारांचा डल्ला
लोकसभा निवडणुकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील सुमारे ९० टक्के अधिकारी, कर्मचारी नेमले होते. त्यामुळे पालिकेतील कारभार गेला महिनाभर खोळंबला होता. कर्मचारीच नसल्याने स्वच्छतेसह इतर कारवाया बंद होत्या. याचा फायदा घेत फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथ ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. सामासिक जागांवर दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत.
पदपथ हे नागरिकांसाठीच असून त्याचा वापर त्यांच्यासाठीच व्हायला हवा अशी पालिका आयुक्तांची भूमिका असली तरी नवी मुंबईतील फेरीवाल्यांचे अतिक्रमण काही कमी होताना दिसत नाही. कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा हेच चित्र पाहावयास मिळत असते. वारंवार कारवाईमुळे हे प्रमाण काहीसे कमी दिसत असतानाच लोकसभा निवडणुका लागल्या. यासाठी नवी मुंबई पालिकेतील ९० टक्के कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त झाला. त्यामुळे या कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसताच पुन्हा एकदा फेरीवाल्याने पथपथांवर अतिक्रमण तर दुकानदारांनी सामासिक जागांत दुकान थाटून वापर सुरू केल्याचे चित्र आहे. बेलापूर कोकणभवन, नेरुळ स्थानक पूर्व, पश्चिम, सीवूड, बेलापूर सेक्टर ९, १० ,सानपाडा, तुर्भे तसेच घणसोली या भागात मोठय़ा प्रमाणात सामासिक जागांचा वापर केला जात आहे.
शहरातील फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. निवडणुकीच्या कार्यकाळातही फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सामासिक जागांचा वापर करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. – डॉ. रामास्वामी एन., आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका