उरण : दिघोडे परिसरात मार्गातील खड्ड्यांची दुरुस्ती व नागरिकांची धोकादायक वाहतूक कोंडीतून मुक्तता करा या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी दिघोडे ग्रामस्थांनी चक्क रस्त्यातील खड्ड्यात बसून आंदोलन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे दुरुस्ती आणि रस्ता रुंदीकरणाचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी दिली.
अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिक, पर्यटक, विद्यार्थी, रुग्णांना त्रास होत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत व लवकरात लवकर सदर रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रीटीकरण करावे या मागणीसाठी दिघोडे गावातील संतप्त नागरिकांनी शुक्रवारी (दि २५) चक्क दिघोडे फाट्यावरील चिखलात रुतलेल्या खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी जवळ जवळ दिड तास चिखलातील खड्ड्यात बसून जनहितार्थ आंदोलन छेडल्याने रस्त्यावर मुंबई व कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग लागली होती.
आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिघोडे गावचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांना सदर रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे लेखी पत्र दिले आहे. आंदोलनात दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील, सरपंच किर्तीनीधी ठाकूर, उपसरपंच संदेश दयानंद पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते रामनाथ पंडित, प्रेमनाथ म्हात्रे, माजी सरपंच संकीता संदिप जोशी, अँड निग्रेस पाटील आदीजण सहभागी होते.
दिघोडे ग्रामस्थांना पावसाळा संपताच रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथील मार्गातील खड्डे भरण्याची कामे सुरू असल्याची माहिती उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली.