उरण : जेएनपीए बाधीत आणि बंदराच्या कक्षेत येणाऱ्या जसखार,सोनारी व करळ -सावरखार या चार गावांतील नागरिकांना गावा अंतर्गत व मुख्य मार्गावरूनही धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या चारही गावांना जोडणाऱ्या अंतर्गत व मुख्य मार्गाला जोड देण्याची मागणी जेएनपीएचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांनी जेएनपीए प्रशासनाकडे केली आहे. देशातील सर्वात मोठं बंदर असलेल्या जेएनपीटी बंदर परिसरातील जसखार,सोनारी व करळ – सावरखार या तीन ग्रामपंचायती मधील चार गावांना जोडणारे मार्ग उभारावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून जेएनपीटी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

जेएनपीटी बंदराला जोडणारे जेएनपीटी ते पळस्पे आणि जेएनपीटी ते नवी मुंबई(आम्र मार्ग)असे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. या दोन्ही महामार्गासाठी जसखार आणि करळ सोनारी या तीन ग्रामपंचायतीना जोडणाऱ्या मार्गा ऐवजी नवीन मार्गावरून वळसा घालून दीड ते दोन किलोमीटर दूरचा आणि धोकादायक प्रवास करावा लागत आहे. परिणामी अधिकचा खर्च ही करावा लागत आहे. तसेच येथील ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या तीन ग्रामपंचायतीतील चार गावे परंपरागत एकत्र व्यवहार करीत आहेत. त्यांचे नातेसंबंध आणि बाजार एकत्र असल्याने या गावातील नागरिकांना एका गावातून दुसऱ्या गावात अनेकदा ये जा करावे लागते.

मात्र येथील रेल्वे मार्ग आणि उड्डाणपूल यामुळे पायी जाणारा मार्ग ही प्रवासा करीता धोकादायक बनला आहे. त्यामुळे या गावातील अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे या गावात सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता गावांना जोडणारा मार्ग किंवा स्काय वॉक उभारण्याची मागणी येथील जेष्ठ नागरिकांनी केली होती. जेएनपीटी बंदर उभारणीसाठी या तिन्ही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमीनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना आवश्यक त्या नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी जेएनपीटीची आहे.

या जेएनपीए प्रशासनाने बंदराला जोडणारे महामार्ग उभारतांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. परिणामी येथील जेष्ठ नागरिक,विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जेएनपीए बंदर बाधीत चारही गावे ही पूर्वापार एकत्रित व्यवहार करीत आहेत. मात्र बंदरा जोडणाऱ्या मार्गामुळे गावा अंतर्गत प्रवास धोकादायक बनला असल्याचे मत जसखारचे माजी सरपंच रमाकांत म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

जसखार,सोनारी व करळ या तीन ग्रामपंचायती मधील चारही गावांना जोडणारे मार्ग तयार करण्यात यावेत यासाठी आपण जेएनपीए कडे मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने या चारही गावांना जोडणाऱ्या मार्गासाठी उड्डाणपुलाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तसे जेएनपीए कडून पत्र आले असल्याची माहिती जेएनपीएचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांनी दिली आहे.