उरण : गेल्या अनेक तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या जेएनपीए ते नवी मुंबईला जोडणाऱ्या आम्र मार्गावरील उलवे नोड मधील वहाळ साई मंदीर,उड्डाणपूला खाली दोन ते अडीच फुटांचे पाणी साचले होते. या पाण्यातून दुचाकी व चारचाकी वाहने हाकली जात आहेत. त्यामुळे धोका अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. उलवे नोड मधील वहाळ गावा नजीक असलेल्या उड्डाणपूलाच्या खाली दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.
भारतीय रस्ते विकास प्राधिकरण (एन एच आय) च्या अखत्यारीत हा राष्ट्रीय महामार्ग ३४८ अ मोडत आहे. या परिसर सखल भागात मोडत आहे. त्यामुळे मुसळधार पावसानंतर या परिसरात पाणी साचत आहे. साधारणतः दोन ते तीन फुटांचे पाणी या मार्गावर साचत आहे. नवी मुंबई विमानतळा नजीकच्या या मार्गावरून नवी मुंबईत ये जा करणारी शेकडो वाहने प्रवास करीत आहेत. या मार्गावरील साचत असलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एन एच आय कडून कोणतीही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही.
उलवे नोड हे झपाट्याने विकसित होणारे व मोठी नागरी वस्तीत रूपांतरीत होत आहे. या नोड मध्ये ये जा करण्यासाठी वापरण्यात येणारा हा प्रमुख मार्ग आहे. पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे ही पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता ही वाढली आहे. त्यामुळे या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील सचणारे पाणी निचरा व येथील खड्डे भरण्याचे काम करण्याची मागणी उलवे नोड मधील नागरिक नरेंद्र कोळी यांनी एन एच आय कडे केली आहे.
