उरण : चिरनेरमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) तर्फे ‘Moth Week 2025’ (पतंग सप्ताह) उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक स्तरावर साजरा होणारा आणि निसर्गप्रेम, जैवविविधतेचे महत्त्व तसेच पतंगांचे पर्यावरणातील योगदान याचा अनुभव देणारा ‘Moth Week 2025’ कार्यक्रम /शनिवारी बापूजी देव देवराई, चिरनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) – सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर-उरण, रायगड (महाराष्ट्र) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात रात्री ८ ते १० या वेळेत पतंग निरीक्षण, लाईट ट्रॅप सेटअपचे प्रात्यक्षिक, पतंगांचे जैविक महत्त्व यावरील जनजागृतीपर मार्गदर्शन, तसेच पतंग फोटोग्राफी व सिटीझन सायन्स प्लॅटफॉर्मद्वारे ओळख असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात फॉन संस्थेचे वन्यजीव अभ्यासक निकेतन रमेश ठाकूर यांनी उपस्थित नागरिक, तरुण आणि पर्यावरणप्रेमी यांना पतंगांचे नैसर्गिक चक्रातील स्थान, त्यांचे खाद्य साखळीतील योगदान आणि नागरिक विज्ञानातील महत्त्व या विषयांवर सखोल माहिती दिली.
या रात्रीच्या कार्यक्रमात निसर्गप्रेमींनी २० हून अधिक विविध प्रजातींचे पतंग प्रत्यक्ष पाहिले. त्यांच्या रंग, आकार, हालचाली यांचे निरीक्षण करत त्यांनी अनोखा अनुभव घेतला. अनेकांनी अशा उपक्रमांना सातत्याने उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सहभागी सर्व नागरिक, मार्गदर्शक, स्वयंसेवक व छायाचित्रकार यांचे संस्थेचे सचिव शेखर अंकुश म्हात्रे यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले.
“उरणमध्ये प्रथमच ‘पतंग सप्ताह २०२५’ चे यशस्वी आयोजन फॉन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान टिपलेली पतंगांची माहिती आणि छायाचित्रे वैज्ञानिक संशोधनासाठी सादर केली जाणार आहेत. उरण विभागातील पतंग जैवविविधतेच्या नोंदीसाठी हे एक महत्त्वाचे दस्तऐवज ठरणार आहे. असे मत फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक अध्यक्ष जयवंत रामदास ठाकूर यांनी व्यक्त केले.