उरण : मागील दोन वर्षांपासून सिडकोच्या दुर्लक्षामुळे उरण-पनवेल राज्य महामार्गावरील खाडीपूल नादुरुस्त आहे. हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी बंद केला आहे. या मार्गाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम धिम्यागतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी काम होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे चार गावांना पावसाळ्यापूर्वी दिलासा नाही.

या रखडलेल्या कामामुळे येथील बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे या चार गावांतील हजारो नागरिकांना खर्चिक व जादा अंतराचा प्रवास करावा लागत आहे. त्यातच या मार्गावर बसविण्यात आलेल्या हाईट गेटमधून अनेक वाहनांचे अपघात होतात. या धोकादायक प्रवासाचाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. उरणमधील रस्ते आणि नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही सिडकोची आहे. ही जबाबदारी सिडकोकडून पार पाडली जात नसल्याने उरणच्या नागरिकांच्या समस्यांत वाढ झाली आहे.

हेही वाचा – वंडर्स पार्कमधील घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

एकीकडे उरणमधील सिडको बाधीत गावांना अनेक नागरिक सुविधा मिळत नाहीत, तर दुसरीकडे येथील गावांना शिरणारे पाणी, खेळाचे मैदान, खुल्या जागा आदी समस्या आहेत. त्याच्याच जोडीला आता नादुरुस्त रस्त्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. उरण-पनवेल मार्ग हा उरण तालुक्यातील नागरिकांच्या वाहतूक आणि प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग आहे. असे असताना या रस्त्याच्या समस्येकडे सिडकोकडून दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा – नवी मुंबई: अँब्रेला राईड अपघातात ५ जखमी; मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या वंडर पार्क मधील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नादुरुस्त खाडीपूल दुरुस्त करण्याची मागणी येथील नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून याचे फारसे गांभीर्य न घेता दुर्लक्ष सुरूच आहे. या संदर्भात सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे कार्यकारी अभियंता हनुमंत नहाने यांच्याशी संपर्क साधला असता खाडीपुलाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे, मात्र भरतीच्या पाण्यामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. यातून मार्ग काढून काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.