आठवडाभरापासून अनियमित लसपुरवठा

नवी मुंबई : गेले आठ दिवस शहरात लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. पालिका प्रशासनाने लसीकरणासाठी ५० केंद्रांचे नियोजन केले आहे. मात्र लस उपलब्ध होत नसल्याने बहुतांश केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहीम सुरू झाली असून या वयोगटातील लसीकरणाचे नवी मुंबईतील सध्या एकमेव केंद्र आहे, तर दुसरीकडे शहरात आठ दिवसांपासून लशींचा तुटवडा असल्याने शहरातील लस मोहिमेवर मोठा परिणाम झाला आहे. कधी लसीची पहिली मात्रा, तर कधी दुसरी मात्रा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दुपारी १ नंतर लसीकरण होणार असेल तरीही नागरिक मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळे शहरातील फक्त पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली येथील रुग्णालयांत लस दिली जात आहे.

आम्हाला लस घ्यायची आहे; पण कोविन अ‍ॅपवर वारंवार प्रयत्न करूनही तारीख व वेळ मिळत नाही. शासनाने लशींचा अधिकचा पुरवठा करावा व आमची फरफट थांबवावी अशी व्यथा सीवूड्स येथील विजय शिंदे या नागरिकाने व्यक्त केली आहे.

तर पालिकेने लसीकरणासाठी योग्य नियोजन केले आहे. राज्य शासन व केंद्र शासनाकडून लस मिळेल त्याप्रमाणे लसीकरण केले जात आहे. योग्य प्रमाणात लस मिळाल्यास नागरिकांना व्यवस्थित लस मिळेल, असे लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.