वाशी खाडीपुलावरील पथदिव्यांचे काम पूर्ण होण्यास अद्याप महिन्याचा कालावधी; पामबीचही अंधारात
नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर वाशी खाडीपुलावर सहा मार्गिकांचे डांबरीकरण डिसेंबर २०१९ अखेरीस पूर्ण झाले. डांबरीकरणाचे काम संपल्या संपल्या राज्य रस्ते विकास महामंडळाने वाशी खाडीपुलावर नव्या पथदिव्यांची सोय तातडीने करण्याचे जाहीर केले होते. पण महिना उलटूनही रात्रीच्या वेळेत मार्गावर वाहनचालकांच्या नशिबी अंधारयात्राच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात भर म्हणून पामबीच मार्गावरील मोराज सर्कल ते आरेंजा कॉर्नर तसेच ऐरोली खाडीपुलही रात्रीस अंधारात बुडत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या मार्गात उजेड पडण्यासाठी अजून महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडी पुलावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. वाशी खाडीपुलावरील पथदिव्यांना वीज पुरवठा करणाऱ्या तारांचे (केबल) काम सुरू आहे. त्यामुळे या कामाला अजून वेळ लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
वाशी खाडीपुल, पामबीच मार्गावर, तसेच ऐरोली खाडी पुलावर काही दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात मोठी कसरत करावी लागत आहे. पामबीच मार्गावरील पथदिवे बंद असल्याबद्दल विद्युत विभागाला विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी त्यामागचे कारण स्पष्ट केले नाही. उलट लवकरात लवकर पथदिवे सुरू करू, असे उत्तर दिले. पामबीच मार्गावरही पथदिवे पथदिवे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे अंधारात अपघाताची शक्यता निर्माण झाल्याची प्रतिक्रिया नियमित प्रवासी दिनेश शहा यांनी व्यक्त केली. महामार्गावर सध्या उरण फाटय़ाजवळ उड्डाणपुलावर काँक्रिटीकरण सुरू असल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे.
वाशी खाडीपुलावरील पथदिवे सुरु होण्यासाठी अजूनही एक महिन्याचा वेळ लागेल. सध्या पथदिव्यांसाठी विद्युत तारा (केबल) टाकण्याचे काम सुरू आहे. पथदिव्यांवर फिटींगही बसवण्याचे कामही अद्याप शिल्लक आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. -एस. एस. जगताप, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी