बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाचे पडसाद राज्यभर उमटत असताना नवी मुंबई वाशी मार्केटमध्ये दिसून आले नाहीत, त्यामुळे गुरुवारी मालाची आवक या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात दिसून आली. मात्र शुक्रवारी संपाचे तीव्र पडसाद उमटण्याची दाट शक्यता असून काही व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात भाजीपाला खरेदी करून त्याची दुप्पट भावाने विक्री सुरू केल्याने त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवर होण्याची शक्यता आहे.

संपाच्या पहिल्या दिवशी वाशीच्या बाजारपेठेत याचा कमी प्रमाणात  परिणाम दिसून आला तर दुसरीकडे बाजारपेठ सुरळीत सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. बाजारात शेतीमालाची गुरुवारी ८० टक्के आवक झाली. या संपाची चाहूल लागताच काही संधिसाधू भाजी विक्रेत्यांनी मोठय़ा प्रमाणात भाजीपाला खरेदी करून ठेवलेला आहे.  भाज्यांची आवक ३ हजार क्विंटलने घटली. बाजारात एकूण २२ हजार ८६० क्विंटल शेतीमालाची आवक झाली आहे. संपाच्या आदल्या दिवशी ही आवक २५ हजार ७१० क्विंटल इतकी नोंद झालेली होती. त्यामुळे भाज्यांचा बाजारभाव १५ ते २० टक्क्यांनी वाढला होता.

फळ बाजारात २० टक्के उठाव

या संपाचा परिणाम फळबाजारातदेखील जाणवला नेहमीपेक्षा या ठिकाणी २० टक्केच मालाची विक्री झालेली आहे. सर्वत्र बंद असल्याच्या कल्पनेने हा उठाव अल्प झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

आमच्या मागण्या जोपर्यंत राज्यशासन मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही ठाम राहणार आहोत.  शेत मालाला योग्य भाव मिळत नाही, तसेच संपामुळे आमचं नुकसान होत असेल तर आम्ही आमचा माल शेतातच कुजवू.  सुदेश दुधाळे, नाशिक, शेतकरी 

संपाची कल्पना आधी असल्याने बुधवारी मालाची विक्री मोठय़ा प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे गुरुवारी संपाचा तितका परिणाम जाणवला नाही, मात्र शुक्रवारी मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.    – संजय पिंपळे, फळबाजार व्यापारी