नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी परिसरात एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या पतीचा खून करून त्याचा मृतदेह खाडीत फेकला. ही घटना तीन दिवसांपूर्वी २१ जुलै रोजी दुपारी घडली. मृतदेह सापडल्यानंतर वाशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संशयीत आरोपी आणि संबंधित महिला यांचं जवळपास दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. यामुळे तिचा पती आणि तिच्यात अनेक वेळा वाद झाले होता. परिसरातील काही लोकांनी महिलेच्या पतीला तिच्या आणि आरोपीच्या संबंधांबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे मृत व्यक्ती थेट आरोपीच्या खोलीवर गेला आणि विचारले की, “मी माझ्या बायकोबद्दल आणि तुझ्याबाबत जे काही ऐकत आहे, त्यात किती तथ्य आहे?”
यावरून आरोपीने त्याच्याशी भांडण सुरू केलं. भांडणाच्या दरम्यान आरोपीने घरात असलेल्या फावड्याने त्याच्यावर हल्ला केला आणि नंतर गळा दाबून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह वाशीच्या खाडीत नेऊन फेकला.
पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली असता, त्याने कबुल केलं की तो त्या महिलेशी लग्न करू इच्छित होता. मात्र महिलेनं त्याचं प्रस्ताव नाकारल्याने त्याला वाटलं की जर पतीला संपवलं, तर कदाचित ती त्याच्याशी लग्नाला तयार होईल. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असून, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.