नवी मुंबई : भाजप मनुवादी आहे, म्हणून यांच्यासोबत समझोता नाही असे वक्तव्य करून प्रकाश आंबेडकर यांनी वंचित ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप पुन्हा एकदा खोडून काढला आहे. तसेच, जे पुरोगामी पक्ष आहेत त्यांच्यासोबत युती करण्याचा आमच्याकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु, तेही झाले नाही. असे म्हणत त्यांनी कॉंग्रेस आणि इतर पुरोगामी पक्षांनाही पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्यातर्फे आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या तासाभराच्या भाषणात अनेक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
प्रकाश आंबेडकर हे नेहमीच आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. आजही त्यांनी आपल्या प्रखर आणि अभ्यासू भाषणातून भाजप-संघ तसेच काँग्रेस व इतर पुरोगामी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. भाजप हा मनुवादी पक्ष असून, त्यांच्यासोबत समझोता करणार नाही असे म्हणताना आंबेडकरांनी काँग्रेस व इतर पुरोगामी पक्षांसाठी आपली दारे उघडी असल्याचे संकेत दिले आहेत. “मी उद्या भाजप सोबत बसलो तर तुमच्याकडे एक हाड ही चघळायला राहणार नाही.” असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणातील वंचित बहुजन आघाडीचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.
तसेच, आगामी महापालिका निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परिणामी, मत विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार निवडून येण्यासाठी अधिक वाव आहे. असे म्हणत कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीचे महत्व अधोरेखित करताना, ज्या दिवशी चळवळीशी बांधिलकी होईल, त्या दिवशी आपण सत्तेची पायरी चढू असा कानमंत्र प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत कामगारांच्या बाजूचे किमान १५ उमेदवार निवडून आणल्यास महापालिकेत कामगारांना न्याय देता येऊ शकेल. केवळ आंदोलने किंवा आंदोलनाचा इशारा देणे यातून कामगारांना न्याय मिळेल असे चित्र सध्यातरी राहिलेले नाही. असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. तसेच, मनुवादी पक्षांसोबत न जाता पुरोगामी पक्षांसोबत युतीसाठी वंचित सकारात्मक असल्याचे संकेत आंबेडकरांनी यावेळी दिले आहेत.