वाढत्या तापमानाचा यंदा लवकर फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरसकट कर्जमाफीसाठी बळीराजा रस्त्यावर उतरलेला असताना मार्चच्या सुरुवातीलाच वाढू लागलेल्या उष्णतेमुळे यंदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या तापमानामुळे घाऊक बाजारातील आवक हळूहळू कमी होऊ लागली आहे. महिनाअखेपर्यंत ही आवक आणखी घटून भाज्यांची दरवाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून मोठय़ा प्रमाणात भाज्या येत असल्याने सध्या ही दरवाढ रोखणे शक्य झाले आहे.

यंदा उन्हाळा लवकर जाणवू लागला आहे. मुंबईतील तापमान तर ३८ डिग्री सेल्सियसच्या घरात पोहोचले आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम शेतमालावर झाला असून भाज्या सडण्याची प्रक्रिया वेगाने होत असते. मुंबईत तापमान वाढत असताना पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी गारवा जाणवत आहे. त्यामुळे कोबी, प्लॉवर, गाजर, टॉमेटो यांसारखी भाजी लवकर बाजारात पाठविण्याची घाई शेतकऱ्यांनी केली आहे.

गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या शेजारी राज्यांतून मोठय़ा प्रमाणात गाजर, वाटाणा घाऊक बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे इतर भाज्यांचे दर सध्या आवाक्यात आहेत. मध्य प्रदेशातील रतलाम आणि इंदुर येथून वाटाणा जास्त प्रमाणात येत आहे. वाटाणा हा भाज्यांचे दर मर्यादित ठेवण्यास हातभार लावत असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे जोपर्यंत बाजारात वाटाणा येत आहे तोपर्यंत भाज्यांचे दर फार वाढणार नाहीत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्यात सध्या सरसकट कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी राजा रस्तावर उतरला आहे. यात शेतमालाला हमीभावाचा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. अतिउन्हामुळे शेतमाल प्रवासादरम्यान सडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाची गरज असते.

उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असल्याने मार्चअखेरीस ही तापमानवाढ भाज्यांच्या दरवाढीला कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी इतक्या लवकर भाज्यांची दरवाढ होत नसे, मात्र यंदा तापमान लवकर वाढल्यामुळे दरवाढ लवकर होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

राज्यातील भाजी बरोबरच शेजारच्या राज्यांतील सध्या भाज्या मुंबईतील घाऊक बाजारात येत आहेत. त्यामुळे बाजारात आवाक सर्वसाधारण आहे. ही आवाक आता हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे भाज्यांची दरवाढ सुरू होईल. साधारणपणे शेजारील राज्यांतून आवक कमी झाली की दरवाढीचा भडका उडत असल्याचा अनुभव आहे, मात्र यंदा ही दरवाढ लवकर होण्याची चिन्हे आहेत.

– कैलाश तांजणे, अध्यक्ष, घाऊक भाजीपाला महासंघ, नवी मुंबई</strong>

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable prices will rise by the end of march
First published on: 14-03-2018 at 04:07 IST