नवी मुंबई पालिका, एमआयडीसीची टोलवाटोलवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वच्छ भारत अभियानात देशात आठव्या क्रमांकावर असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेतील ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील कंपन्यांतून मात्र कचऱ्याचा धूर निघत आहे. कचराकुंडय़ा नसल्यामुळे कंपन्याच्या आवारात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पालिका कचरा उचलत नसल्याचे करण देत कंपन्या हा कचरा जाळत आहेत. तर कंपन्या पालिकेच्या गाडय़ांत कचरा टाकत नाहीत, असे पालिकेचे म्हणणे आहे. या टोलवाटोलवीमुळे सध्या रबाळे, तुर्भे, महापे, पावणेगाव एमआयडीसी परिसरात अस्वच्छता, दरुगधी आणि धूर वाढला आहे.

नवी मुंबईतील रबाळे, महापे, तुभ्रे, पावणे औद्योगिक क्षेत्रामध्ये सुमारे ४५० कंपन्या आहेत. कारखानदार वर्षांला ६०० ते ७०० कोटी रुपये कर भरतात, मात्र कचरा उचलण्यासारखी पायाभूत सुविधा पालिकेने पुरवलेली नाही, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. काही कंपन्या कचरा जाळतात, तर काही जण गटारांत टाकून देतात. धूर आणि दरुगधीमुळे कामगार व परिसरातील रहिवीसी त्रस्त झाले आहेत. कचरा गाडीत कंपन्या कचरा टाकत नाहीत, असा पालिकेचा दावा आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक शौचालयही नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचा कचरा उचलण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची नाही. संबंधित कंपनीधारक हे नवी मुंबई महानगरपालिकेला कर भरतात त्यामुळे ही जबाबदारी पालिकेची आहे. पालिकेशी यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे, तरीदेखील पालिका दुर्लक्ष करत आहे.

प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

कंपन्यांनी कचरा जाळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सकाळच्या वेळी कचरा उचलण्यासाठी आलेल्या गाडय़ामध्ये कचरा टाकावा, अशी सूचना ठाणे-बेलापूर लघू उद्योजक असोसिएशनला पत्राद्वारे करण्यात आली आहे, मात्र कंपन्या याकडे दुर्लक्ष करतात. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळणाऱ्या कंपनीला नोटीस बजावण्यात येईल.

राजेंद्र सोनवणे, मुख्य स्वच्छता अधिकारी, नमुंमपा

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waste smoke in navi mumbai industrial area
First published on: 21-12-2017 at 01:06 IST