मोरबे धरणात पुरेसा साठा झाल्याने नवी मुंबईकरांना दिलासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने गेल्या वर्षी डिसेंबरपासून सुरू असलेल्या पाणीकपातीतून यंदा मात्र नवी मुंबईवासीयांची सुटका झाली आहे. खालापूर तालुक्यातील पालिकेचे मोरबे धरण यंदा भरून वाहिले नसले, तरी दहा- बारा लाख लोकसंख्येला पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा करता येईल इतका पुरेसा साठा या धरणात झाला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सुरू होणारी पाणीकपात टळल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

नवी मुंबई पालिका क्षेत्राला मोरबे, बारवी आणि काही प्रमाणात हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सुमारे ४५० कोटी रुपये खर्च करून विकत घेण्यात आलेल्या खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात गतवर्षी कमी पाणीसाठा होता. त्यामुळे पालिकेने उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळावे म्हणून नोव्हेंबरपासून पाच टक्के कपात सुरू केली, ती मे महिन्यात ३३ टक्क्यांपर्यंत गेली होती. पाणीकपातीची सवय नसलेल्या नवी मुंबईकरांचा जीव कासावीस झाला होता.

गुरुत्वाकर्षणाने शहरात पाणीपुरवठा केला जाईल, हे पालिकेचे आश्वासन फोल ठरल्याने दिवाळ्याला (बेलापूर) चांगला पाणीपुरवठा होत असताना दिव्यातील (ऐरोली) रहिवासी मात्र तहानलेले राहिले होते. पाणीटंचाई यंदाही भोगावी लागेल, अशी भीती होती; पण पाणीकपात करण्याची आवश्यकता नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

माथेरानमधून वाहणाऱ्या पावसाळी धावरी नदीवर बांधण्यात आलेल्या या मातीच्या धरणात यंदा ८८ मीटर पाणीसाठा झाला. परतीचा पाऊस चांगला कोसळल्यामुळे पुरेसा पाणीसाठा झाला. त्यामुळे पुढील वर्षी पाणीकपातीचे संकट मुंबईकरांवर राहणार नाही असे स्पष्ट दिसून येत आहे.

पालिकेने आठ हजार जुने मीटर बदलून नवीन मीटर लावल्याने पाणीगळतीवर नियंत्रण आले आहे. सध्या सुरू असल्याप्रमाणेच पाणीपुरवठा पावसाळ्यापर्यंत कायम राहील, असा विश्वास पालिका प्रशासनाला आहे.

यंदा मोरबे धरण परिसरात चांगला पाऊस पडला. पाण्याची पातळी ८८ मीटपर्यंत पोहोचल्याने नवी मुंबईकरांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. नवी मुंबई पालिका क्षेत्रात रहिवाशांना सरासरीपेक्षा ६५ लिटर पाणी जादा दिले जात आहे. त्यामुळे मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut cancelled in navi mumbai
First published on: 07-12-2016 at 04:16 IST