जखम डोक्याला अन् मलम पायाला, अशी पालिकेच्या कामाची नेहमीचीच पद्धत असते. ऐरोली रेल्वे स्थानकानजीक भुयारी मार्गाचे वर्षभरापूर्वी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ते सिद्ध केल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्यरीतीने व्हावा, अशी अपेक्षा असताना मार्गातील फरशा बदलून आजूबाजूला रंगरंगोटी करण्यात आली आहे. तिचीही अवस्था वर्षभरात अत्यंत दयनीय झाल्याने दुरुस्ती केलीच कशासाठी, असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. ऐरोली भुयारी मार्गातून रेल्वेस्थानक परिसर, याशिवाय ऐरोली गाव आणि सेक्टर १, २, ३, २०, १९, महावितरण कॉलनी, साईनाथ वाडी या ठिकाणी दुचाकी, खासगी वाहने आणि रिक्षांसाठी ऐरोलीत जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्याने या ठिकाणी वाहनांची वर्दळ सुरूच असते.
दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने वर्षभरातच दयनीय अवस्था झाली आहे. भुयारी मार्गाची माहिती व्हावी यासाठी पालिकेने उभारलेले फलक गळून पडले आहेत. तर भुयारातील दोन्ही बाजूंकडील गटारांमध्ये मातीचे थर साचले आहेत. भुयारी मार्गातील विजेचे दिवे बंद पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई हाती घेणे आवश्यक असताना ती सुरू करण्यात न आल्याने यंदाही भुयारात तळे साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या ठिकाणी असणाऱ्या पादचारी मार्गिका ठेकेदारांने काढली आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी स्थानकातील भुयारी मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक व्यवस्था कोलमडते. भुयारी मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे यात अधिक भर पडली आहे. भुयारी मार्गातील गटारांवर लोखंडी झाकणे टाकण्याऐवजी सीमेंटचे ब्लॉक बसविण्यात आले होते. काही ठिकाणचेही गायब झाले आहे. वर्षभरात पावसाळा वगळता एकदाही गटारातील गाळ काढण्यात न आल्याने माती आणि कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गटारांमधील पाण्याचा उपसा करण्यासाठी बसविलेला पंप महिनाभरापासून बिघडला आहे. याप्रकरणी विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ते सुट्टीवर गेल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2016 रोजी प्रकाशित
ऐरोली भुयारी मार्ग यंदाच्या पावसाळ्यातही तुंबणार
भुयारी मार्गाची माहिती व्हावी यासाठी पालिकेने उभारलेले फलक गळून पडले आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-05-2016 at 04:57 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water logging during rain possible in the airoli subway