घणसोली येथील सिडको निर्मिती मेघमल्हार गृहसंकुलात पाणीबाणी समस्या निर्माण झालेली आहे . या संकुलातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ईडब्ल्यूएस) मधील ५ आणि एलआयजी १ इमारतींना २४ तासात केवळ १ तासच पाणी मिळत असल्याने पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे संकुलातील नागरीकांनी संकुल आवारात अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आवाज उठवत शिर्के बिल्डरच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.तळोजा येथे ही सिडकोने बांधलेल्या गृहसंकुलात मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या उद्भवत आहे. आता घणसोली येथील ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ईडब्ल्यूएस) मधील नागरिकांना अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठयाने ग्रासले आहे.

मेघमल्हार गृहसंकुलात गेल्या एक वर्षांपासून नागरी वस्ती वाढली आहे. मेघमल्हारला करिता ३ पाण्याच्या टाकी बसवण्यात आलेल्या आहेत. एल १ ते एल ९ याकरिता २ टाकी उपलब्ध आहेत , तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ईडब्ल्यूएस)च्या ५ इमारती आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) मधील १ इमारत अशा ६ इमारतींकरिता केवळ एकच टाकी उपलब्ध आहे. त्यातही याठिकाणी दर १५ दिवसांनी पाण्याची समस्या भासते अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली आहे. गणेश चतुर्थी पासून या संकुलात केवळ १ तास पाणी येत असून ते ही अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. सिडकोने नियोजन करताना पाण्याचे सुनियोजन करण्यात आलेले नाही अशी ओरड येथील रहिवाशांमधून होत आहे. नवी मुंबई शहराला स्वतः च्या मालकीचे धरण आहे. नवी मुंबई शहरातील घणसोली विभाग हा विकसित झालेला आहे. अशा शहरात आजही नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे , ही मोठी शोकांतिका आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : घरफोडीतील सराईत आरोपीस अटक ; ६० तोळ्यांचे दागिने जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिडको निर्मिती मेघमल्हारमधील ईडब्ल्यूएसच्या ५ इमारती आणि एलआयजीची १ इमारत अशा ६ इमारतींना पाण्याची केवळ एकच टाकी उपलब्ध आहे. त्यात आणखीन भर म्हणजे नियमितपणे पाण्याचा पुरवठा होत नसून अवेळी अवघे एक तास पाणी सोडले जात आहे. त्यामुळे आम्हा रहिवाशांना भीषण पाणी टंचाई भासत आहे. – खुशबू मुधोळकर, मेघमल्हार रहिवासी, घणसोली