पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात मंगळवारपासून अचानक पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) जलवाहिनी अचानक फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी हा बंद पाळण्यात आला होता. बुधवारी सकाळी आठ वाजता एमजेपीचे दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने पाणी पुरवठा पुर्ववत होण्यासाठी गुरुवारची सकाळ उजाडेल. त्यादरम्यान नवीन आपत्ती आल्यास ऐन उन्हाळ्यात पुन्हा मोठ्या पाणी टंचाईचा सामना पनवेलकरांना करावा लागेल.

पनवेल पालिका क्षेत्रातील पनवेल शहर, करंजाडे, कळंबोली, नवीन पनवेल आणि तालुक्यातील २८ गावांना एमजेपीकडून पाणी घेऊन ते वितरीत केले जाते. सोमवारी एमजेपीचे दुरुस्तीचे काम सुरु असताना डेरवली येथे १३२० मीलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद करुन तातडीचे जलवाहिनीला लोखंडी ठिगळ लावण्याचे काम करण्यासाठी एमजेपीचे कर्मचारी मंगळवारी सकाळपर्यंत काम करत होते.

हेही वाचा…नऊ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र अचानक पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी पाण्याचे टँकर खरेदी करुन तात्पुरती तहान भागविली आहे. विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे गृहिणी हैराण झाल्या आहेत. स्वच्छता, स्वयंपाक व धुणीभांडी करण्यासाठी पाणी कुठून आणावे असा प्रश्न पनवेलमधील गृहिणींना पडला आहे.