Navi Mumbai Airport Inauguration 2025 Latest Newsनवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्धाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबईत येत आहेत. या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव मिळावे यासाठी गेली अनेक वर्ष ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील भूमीपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन शाबूत ठेवणारा नेता म्हणून ओळखले जाणारे दिवंगत दिनकर बाळू पाटील म्हणजेच दि.बा.पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळावे यासाठी जोरदार आंदोलने सुरु झाली. नवी मुंबई विमानतळाचे ८ ॲाक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन होत असताना या विमानतळाचा उल्लेख दि.बा.पाटील यांच्या नावानेच केला जाईल का अशी उत्सुकता असताना दि.बा यांचे चिरंजीव अतुल पाटील यांनी एक व्हिडीओ प्रसारीत करत मांडलेल्या मुद्दयांची चर्चा आता रंगली आहे.

‘आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दि. बा. पाटलांचंच नाव’ अशा घोषणेसह हे आंदोलन सुरु झाले. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुसंख्य आगरी कोळी समाजात याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. ‘दि. बा’ची राजकीय कारकीर्द सुमारे पाच-साडेपाच दशकांची होती. नवी मुंबईच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विमानतळ उभे रहात असताना येथील आगरी-कोळी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त समाजाचा संघर्ष सरकार विसरणार का ? असा प्रश्न गावोगावी विचारला जाऊ लागला. जगाच्या नकाशावर चर्चेत असणाऱ्या प्रकल्पांचा गाजावाजा सुरु असताना वडीलधाऱ्यांच्या संघर्षाचे, त्यांनी दिलेल्या जमिनीचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या अस्मितेचे काय, असा सवाल भूमीपुत्रांना नव्या संघर्षाच्या दिशेने ओढू लागला. या अस्मितेच्या केंद्रस्थानी ठरले ते दि.बा.पाटील.

उद्घाटनाच्या काही तास शिल्लक….काय म्हणाले अतुल पाटील ?

सर्वात प्रथम दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांना भावपुर्ण श्रद्धाजली अर्पण करतो. दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाने आज दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमांला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री नायडू, मुरलीधर मोहळ उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना आमंत्रित करताना मला अतिशय आनंद होत आहे. या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे मी विनंती करतो. वाजत गाजत या, ढोल ताशे वाजवत या…दि.बा.पाटील साहेबांच्या नावाचा गजर करत या. या चला आपण नवी मुंबई विमानतळावर पोहचू. या विमानतळाचे नामकरण आज दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होणार आहे. धन्यवाद.

दि.बाची पार्श्वभूमी काय होती ?

दि.बा.पाटील यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी उरण नजीक असलेल्या जासई गावात झाला. त्यांच्या वडिलांचा जासई गाव आणि आसपासच्या परिसरात शिक्षणाचे महत्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. दि.बांचे शिक्षण जरी खडतर परिस्थितीत झाले तरी त्यांनी पुण्यामध्ये वकिलीचे शिक्षण घेतले. रायगड जिल्ह्यात तेव्हा शेतकरी कामगार पक्षाच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत ते सक्रिय झाले. पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष, जुन्या पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघात १९५७ ते १९८४ या कालावधीत पाच वेळा आमदार, एक वेळा विधान परिषदेचे सदस्य, जुन्या कुलाबा (रायगड) लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अशी प्रदीर्घ राजकीय कारकिर्द त्यांना लाभली. महाराष्ट्राच्या सीमा लढ्यात ११ महिन्यांचा कारावास त्यांनी भोगला. करारी आवाज, मुद्देसुद बोलणे आणि शेतकरी-प्रकल्पग्रस्तांसाठी आक्रमक लढा देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहीले गेले. १९६० मध्ये जासई गावात पहिले हायस्कूल त्यांनी सुरु केले. पुढे त्यांनी १० माध्यमिक शाळा सुरु केल्याचे जाणकार सांगतात. १९८२, ८३ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहीले.

८०-९० च्या दशकातील संघर्षशील नेता

मुंबईला पर्याय म्हणून खाडी पलिकडे आणखी एक शहर उभारण्याचा निर्णय त्यावेळी राज्य सरकारने घेतला आणि सिडकोची (सीटी ॲण्ड इंडस्ट्रीयल डेव्हलमेंट काॅपोरेशन) स्थापना केली. सिडकोने पनवेल, उरण आणि ठाणे-बेलापूर पट्ट्यातील ९५ गावातील ५० हजार एकर जमीन संपादनाचा निर्णय घेतला. याच काळात उरण, न्हावाशेवा पट्टयात देशातील सर्वात मोठया ठरणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जेएनपीटीसाठीही सिडकोच्या माध्यमातून भूसंपादन केलं जात होते. नवी मुंबईचा हा संपूर्ण पट्टा शेतकऱ्यांचा जमिनीचा. हा शेतकरी प्रामुख्याने आगरी-कोळी समाजातील होता. मिठागरे, मासेमारी, शेती हे या समाजाची उदरनिर्वाहाची प्रमुख साधने. सिडको करत असलेल्या भूसंपादनामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला.

१० ते १५ हजार एकरी या दराने जमीनीचे भूसंपादन करण्याचा प्रयत्न सिडको आणि राज्य सरकारने केला. त्यास अर्थातच शेतकऱ्यांचा विरोध होता. सिडकोच्या भूसंपादनामुळे भविष्यातील संकटाची जाणीव दिबांना झाली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची हाक दिली. याच काळात वसंतदादा पाटील, शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले असे तीन मुख्यमंत्री होऊन गेले. पण कुणीही शेतकऱ्यांच्या मागणीला दाद देईना. त्यामुळे दि.बांनी १९८४च्या सुमारास आंदोलनाची हाक दिली. १९८४ च्या जानेवारी महिन्यात जासई गावातील मैदानात मोठया संख्येने शेतकरी जमले. शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी एकरी ४० हजाराचा भाव द्यावा असे दिबांचे म्हणणे होते. वसंतदादा पाटील त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी सुरुवातीला २१ आणि नंतर २७ हजाराचा भाव देण्याचा मान्य केले.

मात्र हा निरन्य मान्य करण्यात आला नाही. याच काळात उरण, पनवेल परिसरातील ५० हजारांहून अधिक शेतकरी दास्तान फाट्यावर जमा झाले. जमीन संपादन करायला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला. यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार, गोळीबारात नामदेव घरत (चिर्ले), रघुनाथ ठाकूर (धुतुम), मकळाकर तांडेल (पागोटे), महादेव पाटील (पाहोटे) आणि केशव पाटील या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या संघर्षानंतर राज्य सरकारनं नमतं घेतलं आणि दिबांशी चर्चा केली.