नवी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि मेट्रो -३ च्या अखेरच्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित रहाणार आहेत. या विमानतळावर दुपारी दोन वाजून ४० मिनीटांनी पंतप्रधानांचे विशेष विमान उतरणार आहे. यापुर्वी या विमानतळावर विमान उड्डाणाच्या अनेक चाचण्या झाल्या असल्या तरी पंतप्रधानांचे हे विमान नवी मुंबई विमानतळावर उतरणारे पहिले अधिकृत विमान असणार आहे. पंतप्रधानांचे हे विमान उतरताना पहिली अधिकृत घोषणा काय असेल याविषयीची उत्सुकता आता दुर होऊ लागली आहे.

महामुंबई क्षेत्राच्या आर्थिक उन्नतीचा नवा अध्याय लिहिणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या क्षणासाठी नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील नागरिकांनी तब्बल २० वर्ष प्रतिक्षा केली. बुधवारी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान नव्या धावपट्टीवर उतरणार असून, त्यानंतर विमानतळ परिसरात पहिल्यांदाच येथे अधिकृत उद्घोषणा घुमणार आहे. या विमानतळासाठी गेल्या दोन दशकांत अनेकांनी त्याग, परिश्रम आणि संयम दाखवला.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपली घरे, शेतीची जमीन देऊन विकासाच्या या नव्या पर्वाला हातभार लावला. सिडकोचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक जी.एस. गिल्ल, तानाजी सत्रे, संजय भाटीया, संजय मुखर्जी आणि विद्यमान व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी वेळोवेळी अनेक अडचणींवर मात केली.

शेवटच्या टप्प्यात आलेल्या तांत्रिक अडचणी सोडवून सिडको आणि अदानी उद्योग समूह यांच्यातील समन्वय सह व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या मुख्य महाव्यवस्थापक गीता पिल्लई यांनी साधला. या प्रकल्पाच्या बांधकामात दहा हजाराहून अधिक मजूर, अभियंते आणि कंत्राटदार गेल्या दोन वर्षांपासून दिवसरात्र झटले. आता हे विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईचा रिअल इस्टेट बाजारही झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. पाम बीच रोडवरील भूखंडांची किंमत चौरस मीटरला दहा लाखांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.सिडकोने पुनर्वसित केलेल्या दहा गावांतील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. नुकसानभरपाईच्या पॅकेजमधील गुंतवणुकीतून त्यांनी आलिशान घरे, गाड्या आणि शिक्षणात प्रगती साधली आहे. तसेच नूकसान भरपाईच्या पॅकेजमधील भूखंडावर विकसकांसोबत भागीदारी करून त्यांनी सदनिका बांधून घेतल्या. याच सदनिका भाड्याने देऊन महिन्याला मिळणा-या उत्पन्नावर आणि गुंतवणूक योग्यठिकाणी केल्याने अनेक प्रकल्पग्रस्त सधन झाले आहेत.

पंतप्रधानांच्या स्वागताची पहिली घोषणा काय असेल?

नवी मुंबई विमानतळावर उतरणारे पहिले विमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असेल हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या विमानतळावर उतरणारे पहिले अधिकृत प्रवासी देखील तेच ठरणार आहेत. या विमानतळावर पंतप्रधानांचे विमान उतरावे यासाठी सिडको तसेच नवी मुंबई विमानतळ कंपनीचा पहिल्या दिवसापासून आग्रह होता. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याचा कार्यक्रम थेट या विमानतळापासूनच आखण्यात आला आहे. महामुंबई क्षेत्र बुधवारी या विमानतळावर पहिली उदघोषणा “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत आहे ! ही ऐकणार आहे. “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत आहे” या उद्घोषणेसह या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार हजारो नागरिक होणार आहेत.