लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील शहर अभियंता पदावर असलेले संजय देसाई हे ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शहर अभियंता पदावर आपली निवड होण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याचे बोलले जात आहे.

राज्यभरातील महापालिकांमध्ये आर्थिक स्थिती मजबूत असलेल्या महापालिकांमध्ये नवी मुंबई महापालिकेचाही उल्लेख केला जातो. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी पालिकेपासून ते मंत्रालयापर्यंत अनेकांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. अतिरिक्त शहर अभियंता पदावर असलेले अरविंद शिंदे व शिरीष आरदवाड या दोघांपैकी एकाची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत या पदासाठी अन्य महापालिका तसेच एमआयडीसीतील अनेक अभियंत्यांनी आपली आर्थिक व राजकीय ताकदही पाणाला लावल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे.

नवी मुंबई महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक हे जवळजवळ ४५०० कोटींच्या पुढे आहे. तत्कालीन शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांच्या निवृत्तीनंतर संजय देसाई यांनी शहर अभियंता म्हणून या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. एकीकडे सहशहर अभियंता मनोज पाटील हे नुकतेच निवृत्त झाल्यानंतर कार्यकारी अभियंता असलेल्या अरविंद शिंदे यांना अतिरिक्त शहर अभियंतापदाचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यांच्यासमवेत शिरीष आरदवाड हेसुद्धा अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) या विभागावर कार्यरत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये कुणाची शहर अभियंता पदावर निवड होणार याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

आणखी वाचा-फ्लेमिंगो अधिवासात मद्य मेजवान्या? बीट मार्शलची गस्त व्यवस्था कधी?

वर्षाकाठी सर्वात मोठा खर्च शहर अभियंता विभागामार्फत केला जातो. नवी मुंबई महापालिकेचा ४५०० कोटींपेक्षा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेत १५०० पेक्षा अधिक कोटींचे बजेट एकट्या शहर अभियंता विभागाकडे आहे. त्यामुळे या पदासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या पदावर नियुक्ती व्हावी म्हणून अनेकांनी मागील महिन्यापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले असून तशी तयारीही केली आहे.

महापालिकेत अधिकारी पदावर अधिकाअधिक अधिकारी हे प्रतिनियुक्तीवर पाठवले जात आहेत. त्यामुळे मंत्रालय, मुख्यमंत्री तसेच नगरविकास विभाग आदी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकरवी आपली वर्णी लागावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

आणखी वाचा-पनवेल : कामोठ्यात सहा लाखांची घरफोडी

नवी मुंबई पालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर सरकारी अधिकारी यांची यापूर्वीच वर्णी लागल्याने स्थानिक पातळीवर अनेकांना पदोन्नती देताना प्रतीक्षा करावी लागल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे शहर अभियंतापदावर कोणाची वर्णी लागणार हे गुलदस्त्यात आहे. तर अनेक वेळा मंत्रालयाच्या आदेशाने सरकारी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर पाठवले जात असून त्यामुळे थेट नेमणुकीने आलेले शासनाकडील अधिकारी यांमुळे स्थानिक पालिका अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र पाहायला मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रालयाचा आशीर्वाद?

नवी मुंबई पालिकेच्या शहर अभियंता पदावर यापूर्वी मोहन डगावकर, सुरेंद्र पाटील महापालिकेतीलच अभियंत्यांनी काम केले असून संजय देसाई यांनी गेली तीन वर्षे प्रभारी म्हणून शहर अभियंतापदाचा कार्यभार सांभाळला. त्यामुळे आता या महत्त्वाच्या पदावर पालिकेच्याच दोन अधिकाऱ्यांपैकी एकाची नेमणूक होणार की मंत्रालयाच्या आशीर्वादाने नवा अधिकारी येणार याची उत्सुकता पालिका वर्तुळात आहे.