उपमुख्यमंत्र्यांकडून जागा शोधण्याच्या सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला, फळे, कांदा बटाटा, धान्य आणि मसाल्याचे पाच घाऊक बाजार नवी मुंबईत वाशीत आहेत. यात आता मासळी बाजाराची भर पडणार आहे. मात्र एपीएमसी बाजार आवारात जागा नसल्याने वाशी परिसरात उपलब्ध मोकळ्या भूखंडावर तो उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री व एपीएमसी प्रशासनाची बैठक झाली असून यात जागेचा शोध घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. 

मुंबईतील लोकसंख्येचा वाढता ताण पाहता नवी मुंबई हे शहर सिडकोकडून वसविण्यात आले. वसाहतींबरोबर या शहरात मुंबईतील मोठे घाऊक बाजारही हलविण्यात आले. 

हे सर्व घाऊक बाजार नवी मुंबईत आहेत, मात्र मासळीचा घाऊक बाजार नवी मुंबईत नाही. प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे मच्छी मार्केट आहे. यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक प्रशांत पाटील यांनी नवी मुंबईत घाऊक मासळी बाजार उभारण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी (२६ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एपीएमसीचे सभापती अशोक डक आणि सचिव यांच्यासमवेत बैठक घेतली. यात नवी मुंबईतही घाऊक मासळी बाजारपेठ सुरू होईल असे अजित पवार यांनी सांगितले असून त्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी सिडकोशी चर्चा करून मोकळा भूखंड हस्तांतरित करता येईल का याबाबत या पुढे कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. एपीएमसीत नवीन बाजारासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वाशी परिसरात यासाठी जागेची चाचपणी करण्यात येणार आहे. मात्र हा बाजारही एपीएमसी प्रशासनाकडून चालविण्यात येणार आहे. हा बाजार झाल्यास नवी मुंबईत मासळीची मोठी घाऊक बाजारपेठ उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एपीएमसीमार्फत घाऊक मासळी बाजारपेठ उपलब्ध करण्याबाबत मंगळवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवा्रर यांनी सकारात्मकता दाखवत मासळी बाजार सुरू होईल असा निर्णय दिला आहे. त्यानुसार सिडकोकडून वाशी विभागात मोकळा भूखंड मिळण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. – अशोक डक, सभापती, एपीएमसी वाशी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wholesale fish market in vashi instructions to find a place from the deputy chief minister akp
First published on: 28-10-2021 at 00:00 IST