एपीएमसीत शेतकऱ्याच्या तीव्र विरोधानंतर रक्कम परत

‘शेतकऱ्यांकडून दलाली (अडत) न घेता ती गिऱ्हाईकाकडून घेण्यात यावी’ असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने मागील महिन्यात राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना दिलेले असताना बुधवारी नवी मुंबईतील एपीएमसीच्या फळ बाजारात एका शेतकऱ्याकडून दलाली-अडत (कमिशन) घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला शेतकऱ्याने तीव्र विरोध केल्यानंतर त्यांची कापलेली रक्कम परत देण्यात आली.

पुणे जिल्हय़ाच्या आंबेगाव तालुक्यामधील देवगावातील रमेश दाभाडे या शेतकऱ्याने फळ बाजारात १४ टन कलिंगड विकण्यास आणले होते. त्या वेळी हा प्रकार झाला.

राज्य सरकारने बाजार समिती नियमनमुक्त व्यापार केला आहे. त्याला सर्व बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी प्रारंभी विरोध केला होता. त्यावर तोडगा काढताना शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी दलाली (कमिशन, अडत, पट्टी) यानंतर घाऊक बाजारातील गिऱ्हाईकाकडून घेण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांचा विरोध काही अंशी मावळला आणि त्यांनी गिऱ्हाईकांना समजावून त्यांच्याकडून पट्टी कापण्यास सुरुवात केली आहे. गेले महिनाभर हा व्यापार सुरू असताना फळ बाजारात बुधवारी १४ टन कलिंगड विक्रीसाठी घेऊन आलेल्या रमेश दाभाडे या शेतकऱ्याकडून हांडे वावरे अ‍ॅण्ड कंपनीचे व्यापारी शैलेश नलावडे यांनी ७२०० रुपये पट्टी कापल्याचा आरोप करण्यात आला आहे. दाभाडे यांनी पाच व सहा रुपये प्रतिकिलो दराने एकूण ९९,४०० रुपयांचा माल विकला आहे. त्यावर दहा टक्के कमिशन व्यापाऱ्याने घेतल्याचा दाभाडे यांनी आरोप केला आहे. हांडे वावरे कंपनीच्या नलावडे यांनी हा आरोप फेटाळून लावला असून शेतकऱ्याकडून अडत कापली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या शेतकऱ्याचा माल विकण्याची परवानगी त्यांच्याकडून मागण्यात आली होती. अडत ही गिऱ्हाईकाकडूनच घेण्यात आली असून शेतकऱ्याकडून घेण्यात आलेली रक्कम ही गाडीभाडे आणि हमालीचे असल्याच त्यांनी स्पष्ट केले.