नवी मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ऐतिहासिक क्षण आज (बुधवारी) साकारतोय. बुधवारी दुपारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होत आहे. पण या उद्घाटन सोहळ्याच्या झगमगाटात एक प्रश्न सर्वांच्या चर्चेत आहेत. या विमानतळाच्या व्यासपीठावर नेमकी कोणाची छाप असेल हा प्रश्न या व्यासपीठाजवळ आलेल्या प्रत्येकाला पडत आहे.
बहुप्रतीक्षित विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर पंतप्रधानांचे विमान दुपारी दोन वाजून ४० मिनिटांनी उतरताच देशाचे लक्ष नवी मुंबईकडे वळेल. टर्मिनल इमारतीची आणि यंत्रणेची माहितीचा आढावा घेतल्यावर पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी उड्डाण केंद्रीय मंत्री किंजरापू नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सिडको मंडळ तसेच अदानी कंपनीचे व्यवस्थापक हे सुद्धा टर्मिनल इमारतीपासून काही अंतरावर उभारलेल्या भव्य व्यासपीठाकडे वळतील. पंतप्रधान मोदींच्या सूरक्षेसाठी आणि आलेल्या मान्यवरांची गैरसोय होऊ नये, यासाठी वेगवेगळे तीन व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. यापैकी मुख्य व्यासपीठावरून मोदी हे जनतेला संबोधित करतील. सुमारे २५ हजार नागरिक आणि कार्यकर्त्यांची आसनव्यवस्था या सभेसाठी करण्यात आली आहे. पण या कार्यक्रमाच्या रचनेत राजकीय छटा अधिक ठळकपणे जाणवतात. कारण, ज्या व्यासपीठावरून पंतप्रधान भाषण देणार आहेत ते व्यासपीठचा प्रथम दर्शनीचा भाग फुलांनी सजवला आहे. या फुलांच्या सजावटीला ‘कमळाच्या’ आकारात सजवले गेले आहे.
११६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा विमानतळ आशियातील अव्वल दर्जाचा ठरणार आहे. चार टर्मिनल आणि दोन धावपट्ट्यांचे नियोजन असलेल्या या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज होत आहे. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीची रचना कमळाच्या पाकळ्यांसारखी असल्याने स्थापत्यदृष्ट्याही तो अद्वितीय ठरणार आहे. पण योगायोग इतकाच का? की या ‘कमळाच्या’ रचनेतून भाजपचा राजकीय संदेशही दडलेला आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता व्यक्त केली आहे. नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, भूमिपूजनापासून ते उद्घाटनापर्यंत दोन्ही समारंभ पंतप्रधान मोदींच्याच हस्ते होत असल्याने या विमानतळावर राजकीय ‘ब्रँडिंग’ची छाप पक्की दिसते. हे उद्घाटन केवळ विकासाचे प्रतीक आहे का, की त्यामागे नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात भाजपची एकहाती असलेल्या सत्तेचा बुरूज अजून पक्का करण्यासाठी या सोहळ्याच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी या सोहळ्याचे ब्रॅंडिंग केल्याची चर्चा आहे.
पनवेलमधील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शड्डू ठोकून गेल्या पाच दिवसांपासून सोहळ्याचे नियोजन करत आहे. बेलापूर मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि मंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा सोहळ्याच्या नियोजनात हातभार लावला आहे. चारही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्द्यामुळे आगरी कोळी समाजाची अस्मिता आणि येथील वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन मतदारांवर याच भव्य उदघाटन सोहळ्यातून कमळाची छाप पक्की करण्यासाठी ही ब्रॅण्डिंग सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमळ फुलले अशीच चर्चा व्यासपिठाकडे सकाळपासून आलेल्यांमध्ये होऊ लागली आहे.
एकीकडे महायुतीचा विचार राजकीय दृष्ट्या केल्यास राज्यातील महायुतीमध्ये भाजपचे कमळ हा मोठा भाऊ असला तरी कमळच्या फुलाच्या प्रतिकृतीप्रमाणे महायुतीतील लहान भाऊ असणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा शिवधनुष्य किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह सोहळ्याच्या ठिकाणी कोणत्याच फुल अथवा इतर प्रतिकृतीमध्ये दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.