नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात पालिकेच्यावतीने कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली जातात. नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून कोट्यावधींची कामे शहरात होत असतात. परंतु, नियमानुसार एखाद्या कामाबाबतचा ठेका संबंधित ठेकेदाराला प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष काम करताना आपल्या कामाबाबतचा संपूर्ण माहिती फलक कामाच्या ठिकाणी लावणे आवश्यक असते. परंतु, महापालिकाक्षेत्रात बऱ्याच वेळा ठेकेदार याबाबतचे नियम पायदळी तुडवत असल्याचे पाहायला मिळते. याबाबत संबंधित विभागप्रमुख, तसेच संबंधित अधिकारी यांनी याबाबत कटाक्षाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सीवूड सेक्टर ३० येथील महापालिकेच्या नव्या शाळेचे बांधकाम सुरू असून, या शाळेच्या बांधकाम ठेकेदाराने ठेक्याबाबतचा फलक लावला आहे, परंतु अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या या कामाच्या किमतीबाबत लपवाछपवी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही लपवाछपवी कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात शहर अभियंता, उद्यान, पाणीपुरवठासह अनेक विभागांत कोट्यावधी रुपयांची अनेक कामे सुरू असतात. पालिका पातळीवर होणाऱ्या कामाबाबत रितसर प्रक्रिया राबवूनच काम संबंधित ठेकेदाराला दिले जाते. परंतु, शहरात सुरू असलेल्या या कामाबाबत जनतेलाही याची माहिती असावी यासाठी या कामाचे माहिती फलक कामाच्या ठिकाणी लावणे अत्यावश्यक आहे. परंतु पालिकेत बऱ्याचवेळा अनेक ठेकेदार आपल्या कामाबाबतचे फलक दर्शनी भागात लावत नाहीत, तर काहीजन कामाबाबतचे व निविदेबाबतचे फलक लावण्याची तसदी घेत नाहीत. बेलापूर विभागातील सीवूड सेक्टर ३० येथे शाळेचे बांधकाम सुरू आहे. शाळेचे काम सुरू असून या ठिकाणी होत असलेले काम हे शहर अभियंता विभागामार्फत करण्यात येत आहे. परंतु, या कामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने कामाचा तपशील असलेला फलक लावला आहे, पण त्या फलकावर कामाची रक्कमच लिहली नाही. या पालिका शाळेचे काम जवळ जवळ ६.५० कोटींचे आहे. मग ठेकेदाराची ही लपवाछपवी कशासाठी, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. प्रशासकाच्या काळात पालिकेने सर्वाधिक खर्च केला आहे, त्यामुळे प्रशासकाच्या काळातील सर्वच कामांची चौकशी करण्याची मागणी होवू लागली आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : एपीएमसी अग्नी अहवाल गुलदस्त्यात?
लोकशाही नावापुरती असून नवी मुंबई महापालिकेच्या कामांमध्ये फक्त नोकरशाही व लोकप्रतिनिधीशाही दिसून येते. करोडो रुपये खर्चाची कामे महापालिकेच्या माध्यमातून केली जातात. सर्व कामे पालिकेच्या संकेतस्थळावर का टाकली जात नाहीत. नागरिकांसाठी फक्त आभासी लोकशाही आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. याबाबत आयुक्तांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे नवी मुंबई अलर्ट सिटिझन फोरमचे सुधीर दाणी म्हणाले.
हेही वाचा – नवी मुंबई पोलिसांनी जप्त केला ६१ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा; दोन टेम्पोही ताब्यात
शहरात सुरू असलेल्या विविध कामांबाबतचे फलक लावणे आवश्यक असून, संबंधित ठेकेदार, तसेच अधिकारी यांना याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सूचित करण्यात येईल, असे शहर अभियंता संजय देसाई म्हणाले.