लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : बोकडवीरा पोलीस चौकी ते कोट नाकादरम्यानच्या १६०० मीटर लांबीच्या उरण-पनवेल मार्गाचे रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे सात मीटर रुंद असलेला हा मार्ग १४ मीटर रुंद होणार आहे. तसेच या मार्गाला दुभाजकही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदाही काढली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. हे काम निवडणूक संपताच सुरू होणार असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

उरण ते नेरुळ/ बेलापूर लोकल आणि उरणच्या द्रोणागिरी परिसरात वाढणारी लोकवस्ती यामुळे उरण-पनवेल मार्ग हा प्रचंड रहदारीचा मार्ग बनला आहे. या मार्गावरील वाढत्या वाहनांमुळे अपघातही वाढले आहेत. या मार्गाच्या रुंदीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यात पावसाळ्यात येणाºया मार्गाच्या बाजूच्या झाडा-झुडपांमुळे मार्ग अधिकच अरुंद होतो. त्यामुळे वाहन चालवणे जिकिरीचे होते. त्यात या झाडाझुडपांत काटेरी झाडे असल्याने वाहनचालक जखमी होण्याचा धोका वाढला आहे. याच मार्गावर अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्यानंतर रुंदीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. उरण-पनवेल राज्य मार्ग दोन आस्थापनांत विभागला गेला आहे. यात नवघर ते बोकडवीरा पोलीस चौकीपर्यंतचा मार्ग सिडकोकडे तर कोट नाका ते पोलीस चौकी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.

आणखी वाचा-उरणमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या कोट नाका ते बोकडवीरा चौकी या १६०० मीटर लांबीच्या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. या मार्गाचे काम निवडणूक संपताच सुरू होणार आहे. -नरेश पवार, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण