पनवेल – चार दिवसांपूर्वी खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ येथील घरकाम करणारी महिला पायी चालत असताना तीच्या गळ्यातून ७५ हजार रुपयांचे दागीने दुचाकीस्वारांनी चोरण्याची घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी २७ ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता खारघर येथील सेक्टर १२ येथे घऱकाम करणा-या ५७ वर्षीय महिलेला याच प्रकारे लुटण्यात आले आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेला लुटीबाबत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये सामान्य घरकाम करणा-या महिलांना लक्ष्य केले जात असल्याने पोलिसांनी या चोरट्यांना तातडीने पकडण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
खारघरमध्ये पायी चालणा-या कष्टकरी महिलांना लुटीचे सत्र सुरूच आहे. दुचाकीवर फीरणारे चोरट्यांकडून हे लक्ष्य केले जात आहे. एका दुचाकीवर बसून दोन चोरटे येतात आणि महिलांच्या गळ्यातील दागीने हिसकावून काही सेकंदात फरार होतात अशापद्धतीची या दुचाकीस्वारांची कार्यपद्धत आहे.
खारघर येथील सेक्टर १२ मधील गणेश दर्शन सोसायटीमध्ये राहणा-या ५७ वर्षीय महिला यांनी शिलाई मशीनची मोटार दुरुस्तीसाठी दिली होती. ती मोटार घेऊन त्या घरी येत असताना साई मंदीरासमोरील रस्त्यावर अचानक त्यांच्यासमोर काळ्यारंगाच्या दुचाकीवरून दोनजण समोर आले. दुचाकीवरील मागे बसलेल्या तरुणाने पिडीत महिलेच्या गळ्यातील बोरमाळची पोत हिसकावली आणि काही समजण्याच्या आत तेथून धूम ठोकली. या दागीन्याची किंमत ७२ हजार रुपये आहे.
पनवेल, कळंबोलीत महिलांची सोनसाखळी आणि मंगळसूत्रीचे प्रकार काही दिवस का होईना थांबले असताना खारघर परिसरात पुन्हा सोनसाखळी चोरीचे प्रकार घडण्यास सुरूवात झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी हे प्रकार तातडीने थांबविण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमूण चोरांची धरपकड करण्याची गरज आहे.
मागील दोनही चोरीच्या घटना घरकाम करणा-या कष्टकरी महिलांसोबत घडल्यामुळे सर्वसामान्य वर्गातील महिलांमध्ये असुरक्षित भावना निर्माण होत आहे. यापूर्वीही पायी चालणा-या महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी चोरांना पकडणे आणि जेष्ठ नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटणा-या दुकलीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना अपयश आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी यासाठी विशेष लक्ष्य देण्याची गरज आहे.
गणेशोत्सवानिमित्त शालेय सुट्टीमुळे अनेक कुटूंबिय परजिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी जातात. याचाच फायदा उचलत बंद घरातून चोरीचे सत्र पनवेल व ग्रामीण पनवेलमध्ये सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.