‘गुढीपाडवा : शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रमास सुरुवात
सीमा भोईर नवी मुंबई :
रायगड जिल्हा परिषदेमार्फत जि.प. शाळांमध्ये ‘गुढीपाडवा : शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात शाळांतील पटसंख्या वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी शाळेत दाखल होणे अपेक्षित आहे. ‘गुढीपाडवा : शाळा प्रवेश वाढवा’ हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षी जिल्हा परिषद शाळांमार्फत शाळाप्रवेशाचे वय झालेल्या बालकांच्या गृहभेटी, शाळांची रंगीत जाहिरात पत्रके, दूरध्वनी व एसएमएसद्वारे पालकांचे प्रबोधन या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शालेय कामात समाजाचे सहकार्य वाढत आहे. रायगड जिल्हय़ात सध्या दोन हजार ७४८ शाळा आहेत. त्यात एक लाख तीन हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थीसंख्येत वाढ व्हावी यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार आणि अनुभवी शिक्षकांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते, त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जाहिरातबाजी होत नसे, त्याचा फटका शाळांना बसला आहे, त्यामुळे उत्स्फूर्तपणे जाहिरातबाजी करण्यात यावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांची केली आहे. पाच ते दहा टक्के विद्यार्थी वाढतील, अशी आशा जिल्हा परिषदेत व्यक्त केली जात आहे.
अनेक पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळणाऱ्या सोयी-सुविधांची कल्पना नसते, आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कधीही जाहिरात करण्यात आली नव्हती. गेल्या वर्षीपासून जाहिरात फलक लावण्यात आले. त्यामुळे पटसंख्येत एक ते दोन टक्के वाढ झाली आहे. या वर्षी ती टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
– शेषराव बढे, जिल्हा शिक्षण अधिकारी