एखादी वस्तू किती मोठी असू शकते, हे सांगणे सोपे आहे. कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेकविध घटकांची उदाहरणे देऊन ते सांगता येते. उदाहरणार्थ, कुत्र्यापेक्षा बल मोठा आहे, बलापेक्षा हत्ती मोठा आहे, हत्तीपेक्षा डोंगर मोठा आहे, इत्यादी. पण लहानात लहान वस्तू कोणती, असा प्रश्न विचारला, तर याचे उत्तर काहीसे अमूर्त असू शकते. कारण आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्यासुद्धा असंख्य वस्तू आहेत. कोणत्याही पदार्थाचे आपण लहान-लहान तुकडे करत गेलो; तर सगळ्यात शेवटी मिळणारा भाग कसा असेल, तो किती लहान असेल, असे प्रश्न मनात येतील. अर्थात, या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न मानव प्राचीन काळापासूनच करत आला आहे.

इसवी सनापूर्वी पाचव्या शतकात ग्रीक तत्त्ववेत्ता ल्युसिपस आणि त्याचा शिष्य डेमॉक्रिटस यांनी- ‘सगळे पदार्थ अत्यंत सूक्ष्म अशा कणांनी बनले आहेत’ असा विचार मांडला. एखाद्या पदार्थाचे लहान-लहान भाग करत गेलो, तर कधी तरी अशी एक स्थिती येईल, की तो कण अविभाज्य बनेल. अशा कणाला डेमॉक्रिटसने ‘अटॉमस’ म्हणजे ‘अभेद्य’ असे नाव दिले; त्याचेच पुढे ‘अ‍ॅटम’ असे नामकरण झाले. डेमॉक्रिटसनंतर जवळपास ३०० वर्षांनी लुक्रेटिस नावाच्या रोमन तत्त्ववेत्त्याने अणूची ही संकल्पना उचलून धरली.

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात होऊन गेलेला तत्त्वज्ञ कणाद यानेही अणूची संकल्पना मांडली होती. कणादाने पदार्थाची विभागणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन अशा नऊ घटकांमध्ये केली. यापैकी पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही चार द्रव्ये अत्यंत लहान कणांनी तयार झाली आहेत. या लहान कणांना कणादाने ‘परमाणू’ असे संबोधले. सृष्टीच्या मुळाशी परमाणूच असून एखादा पदार्थ विभागता विभागता शेवटी त्याचे विभाजन न होण्याची वेळ येईल. असा अंतिम भाग म्हणजेच हा कणादाचा ‘परमाणू’! कणादाने या परमाणूंच्या गुणधर्माविषयीही वर्णन केले आहे. कणादाच्या मते, पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचे परमाणू स्वभावत:च निरनिराळे आहेत. हे परमाणू निरनिराळ्या पद्धतींनी एकत्र येत असताना त्यांच्यात नवनवे गुण निर्माण होतात आणि त्यामुळे नवीन पदार्थ तयार होतात. सगळी सृष्टीच अशा प्रकारे परमाणूंच्या मिश्रणाने भरून गेली आहे.

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org