अरॅमिड हा पॉलीअमाइड वर्गातील तंतू आहे. नायलॉनसारखे परंपरागत तंतूसुद्धा पॉलीअमाइड वर्गातीलच असतात परंतु नायलॉनमधील बहुवारिक हे एकरेषीय असते तर अरॅमिड तंतूमधील बहुवारिकामध्ये वर्तुळाकार रचना असलेले रेणू असतात. अरॅमिड हा शब्द वर्तुळाकार रेणूंचे पॉलीअमाइडचे लघुरूप आहे. या तंतूंचे तांत्रिक गुणधर्म हे लोखंड आणि काचतंतू यांच्यापेक्षा खूपच वरच्या दर्जाचे असतात आणि हे तंतू आपले  गुणधर्म उच्च तापमानालासुद्धा टिकवून ठेवू शकतात. त्यांच्या या वैशिष्टय़ामुळे ते धातूंच्या तारा आणि असेंद्रिय तंतू यांच्या बदली वापरले जाऊ लागले आहेत. आणि त्यांचा वापर उच्च तापमानामध्ये, तसेच रसायनांचा प्रादुर्भाव असलेल्या व किरणोत्सर्जन असलेल्या वातावरणामध्ये घालावयाच्या संरक्षक पोशाखात केला जातो.
अरॅमिड तंतूंचे दोन वर्ग आहेत. दोन्ही वर्गातील तंतू उच्च कार्यक्षमता तंतू या वर्गात येतात. पहिल्या वर्गातील अरॅमिड उच्च उष्णतारोधक असतात आणि ते मेटॅअरॅमिड या गटात मोडतात. त्यांची तन्यता मध्यम दर्जाची असून स्थितिस्थापकता कमी असते परंतु त्यांची उष्णतारोधणक्षमता अतिशय उच्च दर्जाची असते. या तंतूंचा वितळणांक ६०० ते ८०० ओ से. इतका असतो त्यामुळे हे तंतू उष्णतेपासून संरक्षणासाठी आणि विद्युतरोधनासाठी अतिशय उपयुक्त असतात. अमेरिकेतील डय़ू पॉन्ट कंपनीने इ.स.१९६५ मध्ये ‘नोमेक्स’ हा पहिला अरॅमिड तंतू विकसित केला. यानंतर तेजीन या जपानी कंपनीने कोनेक्स नावाचा अरॅमिड तंतू बाजारात आणला.
इ.स. १९७० च्या पूर्वार्धात डय़ू पॉन्ट कंपनीने पॅराअमाइड या गटातील ‘केवलार’ हा अरॅमिडच्या दुसऱ्या वर्गातील तंतू विकसित केला. पॅराअमाइड या नवीन बहुवारिकामुळे उच्चतन्यता आणि उच्चस्थितिस्थापकता आणि उच्च तापमानाला आकारस्थिरता असलेल्या तंतूंचे एक नवीन युग सुरू झाले. आज केवलार तंतूच्या अनेक प्रजाती विकसित झाल्या आहेत आणि त्यांच्या गुणधर्मामध्ये मोठी विविधता आहे. तेजीन या जपानी कंपनीनेही या दुसऱ्या वर्गातील अरॅमिड तंतू विकसित केला असून त्याला टेकनोरा असे संबोधले जाते.
अरॅमिड च्या बहुवारिक ५००ओ से. इतक्या उच्च तापमानला वितळते आणि वितळण्यापूर्वी त्याचे विघटन होत असल्यामुळे या तंतूंसाठी वितळकताई प्रक्रिया वापरता येत नाही. अरॅमिड तंतू हे आद्र्र आणि शुष्क अशा दोन्ही द्रावणकताई पद्धतींनी बनविता येतात. या तंतूंचे अंतिम गुणधर्म हे बहुवारिकाची रचना आणि कताईसाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीवर अवलंबून असतात.
चं. द. काणे  (इचलकरंजी) ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – जींद संस्थानातील लोकांचा उठाव
जींद संस्थानचे आजारी राजा भागसिंग यांनी युवराज प्रतापसिंगला राज्याचे रीजंट नेमण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु कंपनी सरकारने याला नकार दिल्यामुळे संघर्ष होऊन, ब्रिटिशांच्या कैदेत प्रतापसिंगांचा मृत्यू झाला. ब्रिटिशांनी नियुक्त केलेल्या दोन शासकांचा अल्पवयातच मृत्यू झाल्याने त्रासून ब्रिटिशांनी जींद राज्यातील लुधियाना, मुडकी वगरे १५० गावे महाराजा रणजीत सिंहाला दिली.
जींदचा पुढचा राजा सरूपसिंग याची कारकीर्द इ.स. १८३७ ते १८६४ अशी झाली. त्याचा ब्रिटिशांशी स्नेह होता पण त्याच्या कुशासन व छळवादामुळे तो प्रजेला नकोसा झाला होता. जींदच्या प्रत्येक गावागावांतून ब्रिटिश सरकार आणि त्यांचा वरदहस्त असलेल्या राजा सरूपसिंग यांना विरोध सुरू झाला. गुलाबसिंग, दलसिंग वगरे शीख नेते यात अग्रस्थानी होते. या विरोधाचे बंडात रूपांतर झाले. एखादा भारतीय संस्थानिक आणि ब्रिटिश सरकार यांच्या विरोधात लोकांनी पेटून मोठय़ा प्रमाणात बंड करण्याचे हे बहुधा पहिलेच उदाहरण असावे.
अखेरीस १८३८ साली ब्रिटिश फौजेच्या तुकडय़ांनी अनेक गावांत प्रवेश करून बंडखोर आणि त्यांना पाठिंबा देणारे गावकरी यांच्यावर अमानुष गोळीबार करून कसे तरी हे बंड दाबून टाकले. जींद संस्थानचे शेकडो नागरिक व त्यांचे नेते यांची हत्या झाली. राजा सरूपसिंगाविरुद्ध एवढे मोठे आंदोलन होऊनही ब्रिटिशांनी त्यालाच पाठिंबा देऊन सत्तेवर कायम केले. त्यामुळे सरूपसिंग स्वार्थासाठी ब्रिटिशांना अधिकच मदत करू लागला. १८५७चा सशस्त्र उठाव झाल्याचे कळल्यावर प्रथम त्याने राज्याची फौज सक्तीने कर्नालकडे पाठवून ब्रिटिश ठाण्याला संरक्षण दिले. आपल्या सन्याच्या तुकडय़ा त्याने ब्रिटिश फौजांना रसदपुरवठा, रस्ते मोकळे करणे यासाठी आघाडय़ांवर पाठविल्या. दिल्लीच्या बंडखोरांवर हल्ले करण्यातही जींदचा मोठा वाटा होता. १८५७च्या केलेल्या मोलाच्या साहाय्याने बक्षीस म्हणून ब्रिटिशांनी जींद राजा सरूपसिंगास दाद्री आणि कुलारन हे परगणे आणि महाराजा हा सन्माननीय किताब दिला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com